केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या छत्तीसगडच्या झांझावाती दौऱ्यावर असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्यावर कडाडून टीका केली आहे. बघेल यांचा प्रचार हवालाच्या पैशातून चालत आहे. त्यांनी बेकायदेशीर बेटिंग व्यवहारातून दलालांकडून शेकडो कोटी रुपये घेतले असून त्याच भांडवलावर काँग्रेसची प्रचार यंत्रणा कार्यरत आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना राज्यात ‘महादेव अॅप’ नामक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे. हे सट्टा बाजाराशी निगडीत प्रकरण असून यात शेकडो कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी राज्यात व्यापक धाडसत्र चालविले होते. अनेक कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसकडून आरोपांचा इन्कार करण्यात आला आहे. मात्र, हा निवडणुकीतील एक महत्वाचा मुद्दा ठरु शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
पत्रकार परिषदेत आरोप
स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत रायपूर येथे हा आरोप केला. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. त्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या सरकारांवर आणि नेत्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप या अॅप घोटाळ्यासंदर्भात नुकताच मुख्यमंत्री बघेल यांनी केला होता. तथापि, प्रवर्तन निदेशालयाने त्याला मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर हे प्रकरण उघड केले आहे, असे प्रतिपादन इराणी यांनी केले. छत्तीसगड राज्य बेकायदेशीर बेटिंगचा धंदा चालविणाऱ्यांसाठी सुरक्षित स्थान बनले आहे. हा धंदा चालविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाऊ नये, यासाठी ते राज्य सरकार चालविणाऱ्या नेत्यांना कोट्यावधी रुपयांचा ‘सुरक्षा निधी’ (प्रोटेक्शन मनी) देत असल्याचे म्हणणे इराणी यांनी मांडले.
पंतप्रधान मोदींकडूनही उल्लेख
छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचारी नेत्यांनी ‘महादेवा’लाही सोडले नाही, अशी खोचक टिप्पणी त्यांनी महादेव अॅप घोटाळ्यावरुन केली. बेकायदेशीर बेटिंग व्यवहारांमधील पैसा प्रचंड प्रमाणात राज्यात निवडणूक प्रचारात उपयोगात आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गुन्हाविज्ञान विष्लेशणाच्या माध्यमातून आणि रोख रकमेची ने आण करणाऱ्या एका कुरियरच्या कबुलीजबाबातून हा घोटाळा उघड झाला आहे.









