मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उच्चाधिकारी समितीप्रमाणे तज्ञ समितीची पुनर्रचना करावी. तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक करावी. तसेच उच्चाधिकारी व तज्ञ समितीच्या सदस्यांनी सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याला चालना द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली. मंगळवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. जयंत पाटील यांनी सीमाप्रश्नाच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांना सीमाप्रश्नाची इत्यंभूत माहिती असल्याने तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी त्यांचे नाव सूचविण्यात आले.
13 जुलैपूर्वी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा
मध्यवर्ती म. ए. समितीने दिल्ली येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सीमावासियांच्या मागण्या मांडल्या होत्या. याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली. 13 जुलैपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे. यापूर्वी उच्चाधिकार व तज्ञ समितीची बैठक बोलाविण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे मध्यवर्ती म. ए. समितीने केली आहे. यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील, आर. के. पाटील, प्रसाद सडेकर, अनिल पाटील, मनोहर हुंदरे यांसह मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य उपस्थित होते.









