माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांचे उपोषण मागे
बेळगाव : चौथ्या रेल्वेगेटचे काम हाती घेण्यात आल्याने तिसऱ्या रेल्वेगेटवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यातच तिसऱ्या रेल्वेगेटचे दुसऱ्या बाजूचे कामही सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच चौथ्या रेल्वेगेटचे काम हाती घेण्यात यावे. जेणेकरून रहदारीची समस्या निर्माण होणार नाही. त्यावर लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस आयुक्त, महापालिका आदींनी लक्ष घालून समस्या सोडवावी, या मागणीचे निवेदन गुरुवारी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर व नागरिकांनी महापौर मंगेश पवार यांना दिले. यावेळी उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आजचे उपोषण माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी मागे घेतले. चौथ्या रेल्वेगेटच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले असल्याने तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे.
त्याचबरोबर तिसऱ्या रेल्वेगेटच्या एका बाजूचे कामही अद्याप सुरू आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत चौथ्या रेल्वेगेटचे काम हाती घेण्यात येऊ नये. त्याचबरोबर तिसऱ्या रेल्वेउड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्यात यावेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी बेळगावात गर्दी होत आहे. महाराष्ट्र व गोव्यातील ग्राहक खरेदीसाठी बेळगावात येत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून चौथ्या रेल्वेगेटच्या उड्डाणपुलाचे काम हाती घ्यावे. विकास करत असताना तेथील परिसराचाही विचार करणे गरजेचे आहे. व्यापारी, स्थानिक नागरिकांचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याची रुंदी किती आहे व तेथून अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका किंवा इतर प्रकारची वाहने व्यवस्थितरित्या ये-जा करतील, याचा सारासार विचार होणेही तितकेच गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.









