सात जणांचा घेतला चावा, स्थानिकांसह प्रवासीही भीतीच्या छायेत
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. शनिवारी रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालय परिसरात बिल भरण्यासाठी आलेल्या चार नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तसेच बाजूच्या कारवार बसस्थानकामध्येही तिघा जणांचा चावा घेतला. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रेल्वेस्टेशन परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा येथे मोठ्या प्रमाणात वावर आहे. कारवार बसस्थानकातून जमा होणारा कचरा स्थानकाच्या एका कोपऱ्यामध्ये फेकला जातो. तसेच आसपास अनेक स्टॉलधारक व हॉटेलमधील शिळे अन्न त्याठिकाणी फेकले जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी रेल्वेप्रवाशांनाही या भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास बिल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. काहीवेळातच कारवार बसस्थानकामध्येही प्रवाशांचा चावा घेतल्याची घटना घडली. या भटक्या कुत्र्यांमुळे रेल्वेस्टेशन परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
मनपाचे प्रयत्न कुचकामी
भटकी कुत्री नियंत्रणात आणण्यासाठी मध्यंतरी महानगरपालिकेकडून कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम सुरू होती. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडून इतरत्र सोडले जात होते. परंतु, ही मोहीम काही दिवसांतच थंडावल्याने शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांबद्दल कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.









