Kolhapur News : आक्षेपार्ह स्टेस्टस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटनेने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शहरात आज कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी प्रशासनाने बंदी आदेश लागू केला आहे. आज सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घ्या. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा पवित्रा हिंदुत्ववादी संघटनने घेतला असून संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हा पोलिसांच्या आवाहनानंतरही हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम आहे. हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले आहेत. समाजकंटकांना तात्काळ अटक करा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे.
नेमकं काय घडलं
मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून मंगळवारी कोल्हापुरात दगडफेक झाली. संतप्त जमावाने शहरातील काही प्रार्थनास्थळावर आणि हातगाड्यांवर दगडफेक करत नासधूस केली. तिघा जणांना मारहाणही केली. आक्रमक झालेल्या जमावावर पोलिसांनी दसरा चौकात लाठीचार्ज करत जमावला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण जमाव पुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर जमा झाला. या ठिकाणी सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे यांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. यानंतर संतप्त कार्यकर्ते निघून गेले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तिघांची चौकशी सुरू केली असून, शहरातील संवेदन ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









