मंगळवारी एक दिवस तर विसर्जनाला दोन दिवस बंदी
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 19 सप्टेंबरच्या सकाळी 6 ते 20 सप्टेंबरच्या सकाळी 6 पयर्तिं बेळगाव शहर व तालुक्यात दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी असणारे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सोमवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दारूविक्री व वाहतुकीवर बंदी असणार आहे. तर श्री विसर्जनाच्या काळातही दारूबंदी असणार आहे. गुरुवार दि. 28 सप्टेंबरच्या सकाळी 6 पासून दुसऱ्या दिवशी 29 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 पयर्तिं दोन दिवस दारूविक्री व वाहतुकीवर बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात बेळगाव शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त व अबकारी अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. बार, दारू दुकाने, हॉटेल व केएसबीसीएल डेपोही दारूबंदीच्या काळात बंद करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात केली आहे.









