चवदार तळ्याच्या आंदोलनाप्रित्यर्थ आयोजन
बेळगाव : दलितांना महाड येथील चवदार तळ्याचे पाणी मिळावे यासाठी 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाच हजार अनुयायांसोबत सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक सत्याग्रहाची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवार दि. 20 रोजी सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जे पाणी पिण्याचा हक्क जनावरांना होता परंतु दलितांना नव्हता, ते पाणी दलितांना पिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खुले करून दिले.
याची आठवण म्हणून दरवर्षी संपूर्ण राज्यभर कार्यक्रम होत असतो. यावर्षी प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम होणार आहे. बेळगावमध्ये एक हजारहून अधिक कार्यकर्ते कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. नागरी हक्क संचलन विभागाचे जिल्हा पोलीसप्रमुख रविंद्र गडादी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी मल्लेश चौगुले, महांतेश तळवार, नागेश कामशेट्टी, संतोष तळवार, सागर कोलकार, शेखर ऐनावर, दीपक धबाडे यांच्यासह इतर उपस्थित होते.









