सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे पर्यटन पोलीस उपक्रम ; 18 दुचाकी वाहनांचे अनावरण ; मालवण बंदर जेटी येथे कार्यक्रम
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण सोहळा कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांच्या हस्ते मालवण बंदर जेटी येथे संपन्न झाला.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्यास अथवा काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे अन्य पर्यटक व नागरिकांना त्रास होत असल्यास पोलीस सेवा तात्काळ उपलब्ध व्हावी. अरुंद रस्ते मार्ग यामुळे पोलिसांचे मोठे वाहन पोहचण्यास अडथळा असल्यास तात्काळ पोहचता यावे. सर्व पर्यटन स्थळे, ठिकाणे याठिकाणी सुरक्षित वातावरण कायम राहावे. याउद्देशातुन ‘सुरक्षित पर्यटन हीच आमची जबाबदारी’ या संकल्पनेतून पोलीस दुचाकी वाहने 24 तास सेवेत उपलब्ध असणार आहेत. मालवण पोलीस ठाणे येथे तीन तर अन्य पोलीस ठाण्यात नियोजन करून ही वाहने दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात नावीन्यपुर्ण संकल्पना जन सेवेच्या दृष्टीने राबवताना पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रम होत आहेत. जेष्ठ नागरिक हेल्पलाईन, पर्यटन मार्गदर्शन व तक्रार बाबत विशेष पेज, पर्यटन पोलीस हे उपक्रम राबवले जात आहेत. याचाही उल्लेख यावेळी मान्यवरांनी केला. वाहन अनावरण सोहळ्यात कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांसह सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सचिन हुंदळेकर, प्रदीप चव्हाण, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस विभागाला नेहमीच सहकार्य करणाऱ्या मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, लायन्स क्लब अध्यक्ष महेश अंधारी, रोटरी क्लब अध्यक्ष रमाकांत वाक्कर, मातृत्व आधार संस्थापक संतोष लुडबे, इतिहास अभ्यासक पीएचडी प्राप्त डॉ. ज्योती बुवा-तोरसकर, युट्युबर व व्हिडिओग्राफर लकी कांबळी, पत्रकार प्रतिनिधी अमित खोत यांचा सन्मान करण्यात आला. तर विशेष कामगिरी बाबत पोलीस पाटील भानुदास येरागी, पवन चव्हाण, पंकज आंगणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी करून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. डॉ. ज्योती तोरसकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मानले.
पर्यटन पोलीस बाईक महत्वपूर्ण सेवा बजावतील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ऐतिहासिक मालवण भूमी आहे. किल्ले सिंधुदुर्ग हा ऐतिहासिक ठेवा आहे. तसेच याठिकाणी सागरी पर्यटनासाठी व मालवणी जेवणाचा आस्वाद लुटण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागात पर्यटकांची संख्या आता वाढत आहे. पर्यटकांना सुरक्षित वातावरण असावे यां दृष्टीने पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर आहे. सोबतच पर्यटन पोलीस उपक्रम अंतर्गत पोलीस बाईक पर्यटन सेवेत महत्वपूर्ण ठरतील. 24 तास ही वाहने सेवेत असतील. असे कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांनी सांगितले.
फोटो : सुरक्षित पर्यटन या पर्यटन पोलीस उपक्रमाअंतर्गत 18 दुचाकी वाहनांचा अनावरण सोहळा कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते संपन्न झाला. (अमित खोत, मालवण)









