प्रतिनिधी,विटा
Sangli News : एकविसाव्या शतकात शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल होत आहेत. काळानुरूप शिक्षण व्यवस्थेत होत जाणारे बदल फक्त स्विकारून चालणार नाहीत तर त्याचा समग्रपणे अभ्यास केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारणे हेच खरे मोठे आव्हान आहे.असे मत ज्येष्ठ लेखक आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले. लेंगरे येथे नव्याने सुरू झालेल्या डी. आर. नाईक निंबाळकर एज्युकेशन सोसायटीच्या अमृतराव निंबाळकर इंटरनॅशनल स्कुलचा शुभारंभ नुकताच झाला. यावेळी प्रा. संजय ठिगळे यांनी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक मा. अमृतराव निंबाळकर यांनी संस्थेच्या स्थापनेचा हेतू विषद केला.
ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसंबंधी बोलताना संजय ठिगळे म्हणाले की, ग्रामीण व्यवस्थेतील शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी माध्यमांचे महत्त्व वाढत चालले आहे. काळाची गरज ओळखून शिक्षण देणे यातच खरे शहाणपण असते. ग्रामीण भागाला शहरी जीवन शैलीचे वेध लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून इंग्रजी शाळा ग्रामीण भागात पाय रोवू लागल्या आहेत.त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत होणारे बदल फक्त स्वीकारून चालणार नाहीत. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.