मनपाचा महत्वाकांक्षी प्रकल्प, मनपावरील कचऱ्याचा ताण कमी करण्यासाठी विविध प्रकल्पांचे नियोजन, आरआरआर सेंटर प्रत्येक वॉर्डात उभारणार
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले गेले आहेत. मनपाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांनी देखील त्यासाठी कंबर कसली आहे. कचरा गोळा करुन तो डेपोमध्ये टाकण्यासाठी महापालिकेला दरवर्षी कोट्यावधी खर्च करावे लागतात. मात्र आता टप्प्याटप्प्याने कचऱ्याचा ताण कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. त्याला यशही मिळत आहे. विशेष करुन नवनवीन संकल्पना राबवली जाणार आहे. आता प्लास्टीक कचऱ्यापासून डिझेल निर्मिती करणार असल्याचे हणमंत कलादगी यांनी सांगितले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांना गती मिळत आहे.
शहरातील कचरा वर्गीकरण आरआरआर सेंट्रलमधून सुरू केले आहे. सध्या कायम स्वरुपी पाच ठिकाणी ही आरआरआर सेंटर सुरू केले आहेत. उद्यमबाग, खासबाग, सरदार्स मैदान, अशोकनगर, भाग्यनगर या ठिकाणी हे सेंटर सुरू करण्यात आले आहेत. कचरा कमी करणे, जुन्या वस्तु पुनर्वापर करणे आणि पुनर्प्रक्रिया करणे यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न सुरू केले आहे. त्याला बऱ्यापैकी यश देखील येत असल्याचे सांगितले.
यामुळे कर्मचायांवरील ताण देखील कमी होणार आहे. सध्या पाच ठिकाणी आरआरआर सेंटर सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्वावर आणखीन पाच आरआरआर सेंटर तयार करण्यात आले होते. मात्र सध्या ती बंद ठेवण्यात आली आहेत. लवकरच संपूर्ण प्रभागांमध्येच ही आरआरआर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे कलादगी यांनी सांगितले.
शहरातील अनेक जण जुने कपडे, जुने बूट, चप्पल हे देत असतात. ते स्वतंत्रपणे ठेवले जात आहेत. त्यानंतर प्लास्टीक देखील बाजूला काढून ठेवले जाते व इतर कचरा एकत्र गोळा केला जातो. ओला कचरा असतो. तो मात्र सध्या कचरा डेपोला पाठविण्यात येत आहे. मात्र पूर्वीपेक्षा डेपोमध्ये निम्म्यापेक्षाही कमी कचरा पाठविण्यात येत आहे. त्यामुळे डिझेलची बचत होत आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांचा ताण देखील कमी झाला असल्याचे सांगितले.
बुट जुने झाल्यानंतर ते बुट आमच्या कर्मचाऱ्यांकडे दिले जातात. ते अत्यंत किंमती बूट असतात. त्यामुळे कोणत्याही गरीबाला हवे असल्यास त्यांना आम्ही देत असतो. सध्या बूट, कपडे मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. ज्या गरजूंना हवे आहेत त्यांना आम्ही देण्यासाठी आम्ही तयारीत ठेवले आहेत.
चिकनचा कचरा नेण्यासाठी मिळाले 1 लाख रुपये
शहरामध्ये चिकनचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा कचरा उचल करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता. मात्र धारवाड येथील एका कंपनीने तो कचरा स्वखर्चाने नेवून त्यावर प्रक्रिया करुन कंपोस्ट तयार करत आहेत. शहरातील चिकन दुकानातील कचरा नेण्यासाठी संबंधित कंपनीने महापालिकेला वर्षाला 1 लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे त्याचाही लाभ महापालिकेला झाला आहे.
भविष्यात अजूनही विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. महापालिकेला करावा लागलेला खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सारे काम करत असून महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवक देखील यासाठी सहकार्य करत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इंदोर येथे अशा प्रकारे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्याचा अभ्यास करुनच आम्ही या ठिकाणी कचऱ्यापासुन इतर उत्पादने घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. चिकन दुकानातील कचरा पूर्वी घेण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. मात्र आता दोन ते तीन कंपन्या पुढे येत असून त्यामुळे त्यासाठी भविष्यात निविदाही काढावी लागणार आहे. एकूणच कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी लागणारा खर्च कमी झाला तर महापालिकेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी यांनी सांगितले.









