परिसरातून दिंड्या मार्गस्थ : विठुरायाच्या दर्शनाची आस
बेळगाव : 8 फेब्रुवारी रोजी माघ वारी असल्याने विविध भागांतून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. वैजनाथ, देवरवाडी, कुद्रेमनी, किणये, धामणे आदी ठिकाणांहून दिंड्यांनी पंढरपूरकडे मार्गक्रमण केले आहे. सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांना ओढ लागली आहे. मजल दरमजल करत दिंड्यांनी पंढरीची वाट धरली आहे. हातात पताका, डोक्यावर कळशी, टाळमृदंगांचा गजर आणि भजनात तल्लीन झालेले वारकरी या दिंड्यांमध्ये दिसत आहेत. सुगी आणि खरीप हंगामातील कामे आटोपून वारकरी प्रत्यक्ष दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. काही दिंड्या पंधरा ते वीस वर्षांपासून अखंडपणे सुरू आहेत. कोरोना काळात मध्यंतरी दोन वर्षे दिंड्या ठप्प झाल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा जोमाने दिंड्या मार्गस्थ होऊ लागल्या आहेत.
जवळ जवळ दहा ते पंधरा दिवस पायी चालत दिंडीतील वारकरी पंढरपूर गाठणार आहेत. दरम्यान, दररोज कीर्तन, भजन, संगीत भजन यासह इतर कार्यक्रमही मार्गावर होणार आहेत. तरुणपिढी व्यसनापासून दूर व्हावी, चांगली संगत मिळावी यासाठी या दिंड्यांचे आयोजन केले जात आहे. दिंड्यांमध्ये सहभागी होण्याचा आनंदही वेगळाच असतो. त्यामुळे अलीकडे दिंडीत वारकऱ्यांचा सहभाग वाढू लागला आहे. एका दिंडीमध्ये साधारण 200 ते 250 वारकरी स्वेच्छेने दाखल होतात. सध्या कडाक्याची थंडी आणि दुपारच्या उन्हाची तमा न बाळगता वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने पडू लागली आहेत. यामध्ये महिला वारकऱ्यांचाही समावेश आहे. माघ वारीच्या पहिल्या दिवशी या दिंड्या पंढरपुरात दाखल होणार आहेत.









