सातारा :
सातारा शहरातील काही मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक मोठा, ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुका! सातव्या दिवशी तब्बल दहा गणपती मिरवणुका निघाल्या, पण डॉल्बी किंवा डीजेचा प्रचंड आवाज नव्हता. पारंपरिक ढोल, ताशा, लेझीम आणि झांज पथकाच्या गजरात झालेल्या या मिरवणुकांनी खऱ्या अर्थाने संस्कृतीची ओळख पुन्हा जपली आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव म्हणजे डॉल्बीचा कानठळ्या बसवणारा आवाज, स्पर्धा आणि दिखावा अशीच प्रतिमा तयार झाली होती. या आवाजाच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिक संघटना, सामाजिक संघटना आणि आरोग्य तज्ज्ञांनी एकत्र येत आवाज उठवला. त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रचंड आवाज लहान पाटकर दवाडी कोती सुप मुलांसाठी, वृद्धांसाठी, गरोदर महिलांसाठी आणि रुग्णांसाठी धोकादायक ठरतो आहे.
या जनजागृतीला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. तरुण भारतसारख्या माध्यमांनी डॉ ल्बीचा हट्ट करणाऱ्यांना आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्यांना आरसा दाखवला. या सामाजिक दडपणामुळे अनेक गणेश मंडळांनी स्वतःहून डॉल्बीचा त्याग करून पारंपरिक वाद्यांचा मार्ग स्वीकारला.
यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला. डॉल्बीवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या पथकांना मानधन देणे. हा पैसा स्थानिक कलाकारांच्या घरात पोहोचतो, त्यांच्या कुटुंबाला आधार मिळतो आणि सांस्कृतिक वारसा जिवंत राहतो. पर्यावरणावर होणारा ध्वनीप्रदूषणाचा दुष्परिणाम तर थांबतोच, पण समाजात आनंद आणि ऐक्याची भावना अधिक दृढ होते
आता पुढचा टप्पा आहे आनंदचतुर्थीचा. साताऱ्याने सातव्या दिवशी दाखवलेला हा आदर्श राज्यभर पोहोचवायचा असेल, तर आनंदचतुर्थीला पूर्ण डॉल्बीमुक्त मिरवणूक करणे गरजेचे आहे. हा बदल साताऱ्याची खरी ओळख ठरू शकतो संस्कृती, परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधणारा सातारा.
डॉल्बीमुक्त सातारा हा केवळ आवाजाचा प्रश्न नाही; हा समाजाच्या जाणिवेचा विजय आहे. साताऱ्यातील गणेश मंडळांनी घेतलेली ही पुढाकार इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरावा, हीच खरी अपेक्षा.








