वार्ताहर/किणये
टाळ-मृदंग व ढोल ताशाच्या गजरात, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत कोंडूसकोप गावात मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची जल्लोषात मिरवणूक काढली. शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात येणार असल्यामुळे गावकरी एकवटले आहेत. शिवस्वराज युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने गावात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली. या मूर्तीसाठी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आर्थिक मदत केली आहे..
पंचधातूमध्ये आठ फुटाची अश्वारूढ मूर्ती साकारली
पंचधातूमध्ये आठ फुटाची अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली आहे. सोमवारी अनगोळ येथून नाथ पै. सर्कल शहापूर, खासबाग श्री बसवेश्वर सर्कल, जुने बेळगाव, हलगा, बस्तवाड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोंडुसकोप गावात आणण्यात आली.
मंगळवारी काढली मिरवणूक
मंगळवारी सकाळी कोंडूसकोप गावात मूर्तीची मिरवणूक काढली. मिरवणुकीत तरुण व तरुणींनी पांढरे कुर्ते परिधान करून सहभागी झाले होते. तसेच डोक्यावर भगवे फेटे बांधण्यात आले होते. यामुळे गावात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हरे रामा हरे कृष्णा’ भक्तांनी या मिरवणुकीत टाळ मृदंगाच्या गजरात विविध अभंग गायले व हरे रामा हरे कृष्णाचा गजर केला. ढोल ताशांच्या तालावर तरुणाईने विविध नृत्य सादर केली. गावात ठिकठिकाणी या मिरवणुकीची जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. महिला आरती ओवाळून मिरवणुकीचे स्वागत करत होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.
येत्या दोन महिन्यात मूर्तीचे अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी चौथरा बांधण्यात आला आहे. या चौथऱ्यावर मूर्ती बसविण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.









