महालक्ष्मी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ
वार्ताहर /किणये
पारंपारिक वाद्यांचा गजर व भंडाऱ्याची उधळण करत महालक्ष्मी देवीची मिरवणूक बिजगर्णा गावात मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पंचक्रोशीतील नागरिकांनी गावात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बिजगर्णा गावची ग्रामदेवता महालक्ष्मी देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला रविवारपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे.
रविवारी गावात काढण्यात आलेली महालक्ष्मी देवीची मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत देवीची मिरवणूक सुरू होती.
महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांनी सढळ हस्ते मदत केली आहे मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यालाही भाविक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवार दि. 19 रोजी सकाळी गणेश पूजन, कुमारी पूजन, मातृका पूजन, मंडप पूजन, गोमाता पूजन, जलाधिवास आदी कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
मंगळवार दि. 20 रोजी पहाटे काकड आरती, त्यानंतर होमहवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे









