ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशनची मागणी, पेडणे वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
पेडणे / प्रतिनिधी
मोपा विमानतळावर स्थानिकांना टॅक्सी काउंटर देण्याचा आणि तो नोटिफाय करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली याची चौकशी करण्यासाठी ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशन यांच्यावतीने गुऊवारी पेडणे वाहतूक खात्याचे साहाय्यक अधिकारी राजेश नाईक, साहाय्यक अधिकारी प्रल्हाद देसाई यांची भेट घेतली. यावेळी याबाबत प्रश्न विचारून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष भास्कर नाऊलकर, ऍड. जितेंद्र गावकर, ऍड. प्रसाद शहापूरकर, भारत बागकर, सुरेश परब, संजय आरोसकर, नंदकुमार मावळणकर आदी टॅक्सी व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी भास्कर नाऊलकर तसेच संघटनेच्या वतीने वाहतूक खात्याचे साय्हायक अधिकारी राजेश नाईक व प्रल्हाद देसाई यांच्याशी चर्चा केली. गेले सहा महिने पेडणेतील टॅक्सी बांधवांना हक्काचा टॅक्सी स्टॅण्ड मोपा येथील विमानतळावर देण्यासाठी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र सरकार याबाबत चालढकल करत आहे. ही प्रक्रिया तातडीने पुढे न्यावी अशी मागणी यावेळी भास्कर नाऊळकर यांनी केली. यावेळी बोलताना अधिकारी राजेश नाईक, प्रल्हाद देसाई यांनी आम्ही शक्यतो लवकर सरकारच्या आणि वाहतूक खातेच्या नियमानुसार प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. सरकारने यावर गांभीर्याने लक्ष देऊन पेडणेकरांना हक्काचा टॅक्सी स्टॅन्ड आणि काउंटर देण्यासाठी वाहतूक खात्याला आदेश देऊन ही प्रक्रिया लवकरात सुरू करावी अशी मागणी भारत भागकर यांनी केली.
यावेळी पत्रकारांकडे बोलताना भास्कर नाऊलकर म्हणाले की मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटर देण्यासाठी गेले अनेक महिने आमचे आंदोलन सुरू केलेले आहे. आता सरकारने टॅक्सी काउंटर देण्यासाठी आणि तो नोटिफाय करण्यासाठी प्रक्रिया जलद गतीने सुरू करावी. भाजपचे अधिकारी जी.एम.आर कंपनीकडे संपर्क कऊन महाराष्ट्रातील एक हजार गाड्या मोपा विमानतळावर आणणार आहेत. तशी माहिती पुढे येत असून आमदारांना याबाबत काहीच कसे काय माहित नाही. ही माहिती आपल्याला मिळाली असल्याचा दावा ऍड. जितेंद्र गावकर यांनी केला. यावेळी ऍड.प्रसाद शहापूरकर यांनी सराकारने आता जलद गतीने टॅक्सी काऊंटर पेडणेकरांना द्यावा अशी मागणी केली.









