माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी
महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हय़ातील करवीर हा सर्वात मोठा तालुका आहे. तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येचा ताण प्रशासकीय कामकाजावर पडत आहे.त्यामुळे प्रशासकीय काम सोयीस्कर होण्यासाठी तालुक्याचे विभाजन होणे आवश्यक आहे. विभाजनाची कार्यवाही प्रलंबित राहिली आहे, ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
महसूल मंत्री विखे-पाटील रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांनी त्यांची भेट घेवून जिल्हय़ातील प्रशासकीय, विकासात्मक व कायदेविषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर विमानतळासाठी नव्याने संपादित होणाऱ्या गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील 64 एकर जमीनीमधील लक्ष्मीवाडी या वसाहतीचे पुनर्वसन सर्व्हे नं. 291 मध्ये व्हावे, गट नं. 328 ब मधील गायरान क्षेत्र पुन्हा ग्रामपंचायतीस देण्यात यावे. कोल्हापूर जिह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील वाढीव गावठाण मधील क्षेत्रधारकांची नावे 7/12 पत्रकी नोंद व्हावी. तसेच कोल्हापूर शहरातील शिल्लक रहिवाशी भागाची सीटी सर्व्हे मोजणी होवून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. खनिकर्म उत्खनन कायद्यात दुरुस्ती करावी व कोल्हापूर जिह्यातील मंजूर असलेल्या तलाठी चावडी व महसूल कार्यालयांच्या बांधकामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रलंबित मागण्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन मंत्री विखे-पाटील यांनी माजी आमदार महाडिक यांना दिले.