बेळगाव जिल्ह्यातील 12 जागांसाठी होणार पोटनिवडणूक
बेळगाव : राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. कर्नाटक ग्राम स्वराज्य आणि पंचायतराज कायद्यांतर्गत या निवडणूक होणार असून ज्या ग्राम पंचायतमध्ये काही कारणास्तव रिक्त जागा झाल्या आहेत, त्यांच्यासाठी या निवडणुका होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 12 ग्राम पंचायतींच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. बेळगाव तालुक्यातील तीन ग्राम पंचायतींचा यामध्ये समावेश आहे. बेळगाव तालुक्यातील धामणे एस., कडोली, हिंडलगा या ग्राम पंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी निवडणुका होणार आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील निपाणी, चिकोडी, मुडलगी, हुक्केरी, रायबाग, गोकाक, बैलहोंगल आणि अथणी तालुक्यातही निवडणुका होणार आहेत. दि. 23 जुलै रोजी निवडणुका होणार असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्राम पंचायतींना पाठविले आहे. ज्याठिकाणी बिनविरोध निवड होणार आहे त्याठिकाणच्या निवडणुका रद्द करण्यात येणार आहेत. ज्याठिकाणी निवडणूक होणार आहे त्याठिकाणी मतदान घेण्याची तयारीही करण्यात आली आहे. दि. 6 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 12 जुलैपर्यंत चालणार आहे. दि. 13 रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून ओळखपत्र व अर्ज छाननीचे काम करण्यात येणार आहे. दि. 15 जुलै अर्ज माघार घेण्याचा दिवस आहे. तर दि. 23 जुलै रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होणार आहे. दि. 26 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्राम पंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत.









