वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. 7 व्या वेतन आयोगानंतर आता वित्त विभागाने आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरु केली आहे.
आठव्या वेतन आयोगाची फाईल लवकरच तयार होण्याची शक्यता आहे. या आयोगाच्या सूचना स्वीकारल्या गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये केंद्र सरकारकडून ही भेट कर्मचाऱ्यांना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अद्याप या वृत्ताला केंद्र सरकारकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नसला तरी दिसणाऱ्या हालचालींवरुन हे अनुमान काढण्यात आले आहे. आठवा वेतन आयोग केंद्राच्या विचाराधीन आहे, ही बाब निश्चित मानली जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या आयोगाच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
वेतन किती वाढणार?
7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात वेतनवाढ अधिक प्रमाणात होणे शक्य आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 पट केला जाईल. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 44.44 टक्के वाढ होईल. याशिवाय इतरही अनेक सुविधा कर्मचाऱ्यांना देण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.









