वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त : वाहनचालकांची मोठी अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
मालवाहू रेल्वे तब्बल अर्धा तास टिळकवाडी परिसरात थांबल्याने वाहनचालकांची मोठी अडचण झाली. रेल्वे थांबल्याने परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. अचानक हा प्रकार घडल्याने वाहनधारकांना गोगटे सर्कलमधून ओव्हरब्रिजमार्गे मार्गक्रमण करावे लागले.
सध्या मिरज-लोंढा यादरम्यान दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जेथे काम सुरू असेल तेथे रेल्वे थांबविली जात आहे. बुधवारी दुपारी 4.20 च्या सुमारास एक मालवाहू रेल्वे पहिले-दुसरे रेल्वेगेट दरम्यान थांबली. रेल्वेगेट ओलांडण्यासाठी थांबलेले वाहनचालक बराच वेळ झाला तरी गेट उघडत नसल्याने संतापले होते. ही रेल्वे का थांबली? हे कोणालाच समजत नव्हते. परिणामी ही रेल्वे तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ थांबल्याने पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ती हटविण्यासाठी रेल्वे जाण्याची प्रतीक्षा वाहतूक पोलीस करत होते.
रेल्वे गेल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. परिणामी रेल्वे का थांबली किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील का? याची चौकशी केली असता निश्चित कारण समजू शकले नाही. अचानक रेल्वे थांबल्याने कोणालाच काही कळत नव्हते. कामावर किंवा घरी जाण्यास उशीर होत असल्याने अनेकांनी इतरत्र मार्ग पत्करून जाणे पसंत केले. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला.









