कॅन्टोन्मेंटच्या दुर्लक्षामुळे रात्रीबरोबरच दिवसाही गैरप्रकार : महिला प्रवाशांमधून तीव्र संताप
बेळगाव : रेल्वे स्टेशनसमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानक परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. कॅन्टोन्मेंटच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी रात्रीबरोबरच दिवसाही गैर प्रकार घडत आहेत. सोमवारी बसस्थानक परिसरात असाच एक प्रकार घडल्याने महिला प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड व स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नवीन बसस्थानक तयार करण्यात आले. यातील दुकानगाळे तयार होऊन अनेक वर्षे झाली तरी ते अद्याप गाळेधारकांना देण्यात आलेले नाहीत. काही दुकानगाळ्यांच्या निविदा काढण्यात आल्या. परंतु, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे दुकान गाळे तसेच पडून आहेत. या दुकानगाळ्यांचा वापर गैरधंद्यांसाठी केला जात आहे. दुकानगाळ्यांना समोरुन कुलूप असले तरी मागील बाजूने दुकान गाळे खुले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी महिला प्रवाशांना येथून प्रवास करणेही दिवसेंदिवस कठीण होत आहे.
मद्यपींचा नंगानाच
बसस्थानकात अनेक ठिकाणी बसण्यासाठी बाकडी करण्यात आली आहेत. याठिकाणी येऊन दारू ढोसत धिंगाणा घालण्याचे प्रकार दिसून येत आहेत. तसेच जिकडे तिकडे गैरवर्तन तसेच महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी तर एका मद्यपीने एका भटक्या महिलेला दारू पाजवून तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. बसस्थानकावरील तरुणांनी त्या मद्यपीला प्रसाद देताच त्यांने पळ काढला.
आता अधिकाऱ्यांनी उपाययोजना करणे गरजेचे
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांनी एकदाही या परिसराला भेट दिलेली नाही. त्या दुकान गाळ्यांची अवस्था पाहिल्यास अधिकारीदेखील पुन्हा तेथे पाय ठेवणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.









