वर्षभरापासून अर्धवट ठेवण्यात आलेल्या कामांमुळे संताप
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात आलेली विकासकामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून कामे कधी पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान मागील वर्षभरापासून याकडे लक्ष देण्यात आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. क्लब रोडवर रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर पेव्हर्स घालून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र अनेक ठिकाणी काम अपूर्ण सोडण्यात आले आहे. बसविण्यात आलेले पेव्हर्स वेगवेगळ्या कारणांनी उखडण्यात आले आहे. मात्र ते काम पूर्ण झाल्यानंतर पेव्हर्स व्यवस्थित बसविण्यात आले नसल्याने पथपदावर खड्डे निर्माण झाले आहेत. याचा पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. पहाटेच्यावेळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. अंधुक प्रकाशात तसेच रात्रीच्यावेळी पदपथावरील उखडलेले पेव्हर्स त्रासदायक ठरत आहेत. याकडे स्मार्ट सिटी योजना अधिकारी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वीज वाहिन्या घालण्यासह वेगवेगळ्या कारणांसाठी बसविण्यात आलेले पेव्हर्स उखडले आहेत. यामुळे त्या ठिकाणी खड्डा निर्माण होवून वृद्ध नागरिकांना दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. त्यासाठी उखडलेले पेव्हर्स बसविण्याची मागणी केली जात आहे.









