बेळगाव : कणबर्गी गावातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात ग्रामस्थांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते. यानंतर तातडीने गुरुवारी हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांच्याकडून गावातील वीजखांब दुरुस्ती, सरकारी मराठी, कन्नड, उर्दू शाळेसमोरील नवीन केबल घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कणबर्गीतील समस्या सोडविण्याकडे हेस्कॉम आणि महापालिकेने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त शुभा बी. यांची भेट घेऊन समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन दिले होते.
निवेदन स्वीकारल्यानंतर संबंधित समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले होते. आयुक्तांच्या सूचनेनुसार गुरुवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी गावात दाखल होत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीजखांबावरील तारांची दुरूस्ती तसेच सरकारी शाळांसमोरील नवीन केबल घालण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करण्यात आलेल्या समस्या मार्गी लागल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी एसडीएमसीचे अध्यक्ष किसन सुंठकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समस्या आणून दिल्या.









