वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिफा वर्ल्ड कप पात्रता लढतीसाठी भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 28 सदस्यीय संभाव्य संघाची घोषणा केली असून त्यात सुनील छेत्री, गुरप्रीत सिंग संधू, संदेश झिंगन यासारख्या बड्या खेळाडूंनाही त्यात समावेश आहे.
फिफा वर्ल्ड 2026 व एएफसी आशियाई चषक 2027 प्राथमिक पात्रता स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या पहिल्या दोन सामन्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. गट अ मधील पहिल्या सामन्यात भारताची लढत कुवैतशी 16 नोव्हेंबर रोजी कुवैत सिटी येथे होईल. त्यानंतर मायदेशात कतारविरुद्धचा सामना 21 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर येथे होईल. भारतीय संघ 8 नोव्हेंबर रोजी सराव शिबिरासाठी दुबईला प्रयाण करणार आहे.
निवडण्यात आलेले 28 संभाव्य खेळाडू : गोलरक्षक-अमरींदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ. बचावफळी-आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, राहुल भेके, रोशन सिंग नाओरेम, संदेश झिंगन, सुभाशिष बोस. मध्यफळी-अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, ग्लान पीटर मार्टिन्स, लालेंगमाविया, लिस्टन कुलासो, महेश सिंग नाओरेम, नंदकुमार सेकर, रोहित कुमार, सहाल अब्दुल समद, सुरेश सिंग वांगजम, उदांता सिंग कुमाम. आघाडी फळी-इशान पंडिता, लालियानझुआला छांगटे, मनविर सिंग, राहुल कनोली प्रवीण, सुनील छेत्री, विक्रम प्रताप सिंग.









