वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने वरिष्ठ पुरूष हॉकीपटूंसाठी राष्ट्रीय सराव प्रशिक्षण शिबिर बेंगळूरमध्ये आयोजित केले असून या शिबिरासाठी 39 हॉकीपटूंची निवड जाहीर करण्यात आली आहे. सदर शिबिर बेंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) व्रेंदामध्ये 26 जून ते 19 जुलै दरम्यान घेतले जाणार आहे. हे शिबिर संपल्यानंतर भारतीय हॉकी संघ स्पेनच्या दौऱ्यावर जाणार आहे. स्पेनमधील टेरेसा येथे होणाऱ्या स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या शतक महोत्सवानिमित्त स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सहभागी होणार आहे. सदर स्पर्धा 25 ते 30 जुलै दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेनंतर चेन्नईत 3 ऑगस्टपासून प्रतिष्ठेची हिरो पुरस्कृत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये यजमान भारत, कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि चीन या सहा संघांचा समावेश राहिल.
बेंगळूरमध्ये होणाऱ्या प्रशिक्षण सराव शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या 39
हॉकीपटूंच्या यादीत गोलरक्षक कृष्णन बहाद्दुर पाठक, पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा, पवन मलिक, प्रशांतकुमार चौहान, हरमनप्रित सिंग, जरमनप्रित सिंग, सुरिंदर कुमार, वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरींदर सिंग, जुगराज सिंग, मनदिप मोर, निलम संजीबझेस, संजय, यशदिप सिवाच, दीपसेन तिर्की, मनजीत, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेकसागर प्रसाद, एम. रवीश्चंद्र सिंग, समशेर सिंग, निलकांत शर्मा, राजकुमार पाल, सुमीत, आकाशदिप सिंग, गुरुजंत सिंग, मोहम्मद राहिल मुसेन, मनिंदर सिंग, एस. कार्ति, मनदिप सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रित सिंग, सुखजित सिंग, सिमरनजित सिंग, शिलानंद लाक्रा, पवन राजबर यांच समावेश आहे. या सराव प्रशिक्षण शिबिरात भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकीपटूंना प्रमुख प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 2022-23 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या हॉकी प्रो-लिग स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी झाली असून त्यांनी बेल्जियम आणि हॉलंड विरुद्धच्या सामन्यात दर्जेदार खेळ केला होता. हिरो पुरस्कृत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा चेन्नईत 3 ऑगस्टपासून खेळविली जाणार आहे. यानंतर भारतीय हॉकी संघ चीनमध्ये होणाऱ्या 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे.









