पुणे / प्रतिनिधी :
उमेदवारांना पुढील वर्षातील परीक्षेचे नियोजन करता यावे म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने दरवर्षी संभाव्य वेळापत्रक घोषित करण्यात येते. यंदा यूपीएससीने पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या विविध 24 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांची पसंती असलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा 26 मे 2024 रोजी नियोजित आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर 2024 महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आता तयारीसाठी वर्षाचा कालावधी आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या तारखांसह जाहिरात कधी निघणार, अर्ज करण्याची अंतिम मुदत ही माहिती दिली आहे. नागरी सेवा परीक्षेसह वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वैद्यकीय सेवा, सीडीएस, जिओ सायंटिस्ट, सीआयएसफ आदी परीक्षांचा समावेश आहे.
परीक्षांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. दरम्यान, परिस्थितीनुसार परीक्षेचा तारखा, अधिसूचना किंवा परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदतीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या परीक्षांचे 2024 मधील वेळापत्रक
अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा – 18 फेब्रुवारी (रविवार)
सीडीएस परीक्षा (1) – 21 एप्रिल (रविवार)
नागरी सेवा (पूर्व) परीक्षा – 26 मे (रविवार)
भारतीय वन सेवा (पूर्व) – 26 मे (रविवार)
संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा – 14 जुलै (रविवार)
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACS) परीक्षा – 4 ऑगस्ट (रविवार)








