15 ऑक्टोबरला भारत-पाक आमनेसामने : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याने वर्ल्डकपला होणार सुरुवात : पुणे, मुंबईतही सामने
वृत्तसंस्था/ मुंबई
यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. 8 ऑक्टोबरला टीम इंडियाचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यानंतर वर्ल्डकपमधील हायहोल्टेज भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला असून त्यावर सर्व देशांकडून अभिप्राय घेण्यात आला आहे. यामुळे अंतिम वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या ड्राफ्टनुसार वर्ल्डकप हा 5 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. वर्ल्डकपची फायनल ही 19 नोव्हेंबरला होईल. सेमीफायनल 15 आणि 16 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. मात्र अजून त्यांचे ठिकाण निश्चित झालेले नाही.
टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने
भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतील सर्वात मोठा म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. एक लाख प्रेक्षक क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल. याशिवाय, 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये वर्ल्डकपचा अंतिम सामना होईल. इतर मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड 29 ऑक्टोबरला धरमशाला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड 4 नोव्हेंबरला अहमदाबाद आणि 1 नोव्हेंबरला पुण्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील. भारतीय क्रिकेट संघ ग्रुप स्टेजमध्ये 9 शहरांमध्ये खेळणार आहे.
यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. टीम इंडिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिरात आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
भारताचे वर्ल्डकपमधील संभाव्य वेळापत्रक
- भारत वि. ऑस्ट्रेलिया 8 ऑक्टोबर, चेन्नई
- भारत वि. अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, नवी दिल्ली
- भारत वि. पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत वि. बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे
- भारत वि. न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धरमशाला
- भारत वि इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ
- भारत वि. पात्र झालेला संघ, 2 नोव्हेंबर, मुंबई
- भारत वि. दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता
- भारत वि. पात्र झालेला दुसरा संघ, 11 नोव्हेंबर, बेंगळूर.









