कोल्हापूर :
मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र–कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. पी. एस. पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम‘ या संशोधन मंचाने सन 2024 ची विविध विषयांतील जागतिक आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये डॉ. पाटील मटेरियल सायन्समधील संशोधनात देशात नवव्या स्थानी आहेत.
मटेरियल सायन्समधील संशोधनात डॉ. पाटील यांचे संशोधकीय निर्देशांक उच्च दर्जाचे आहेत. त्यांच्या संशोधनाचा एच–इंडेक्स 94, आय-10 इंडेक्स 540 तर डी–इंडेक्स 88 इतका आहे. त्यांचे 600 हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. संशोधनास 33,880 सायटेशन्स मिळाली आहेत. संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधांचे संदर्भ आपल्या संशोधनात दिले आहेत. रिसर्च डॉट कॉमने सन 2024 मध्ये विषयनिहाय जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये डॉ. पाटील यांना मटेरियल सायन्समध्ये देशातील पहिल्या 10 संशोधकांमध्ये आणि जागतिक स्तरावर 1512 वे स्थान मिळाले आहे. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीतही त्यांचे स्थान वरचे आहे, तर ए.डी. सायंटिफिक निर्देशांक आकडेवारीतही त्यांचा समावेश आहे.
डॉ. पाटील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक असून, मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात गेल्या 35 वर्षांपासून अध्यापन व संशोधन करीत आहेत. नॅनोमटेरियल्स, थिन फिल्म्स आणि ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात संशोधन आहे. ही क्षेत्रे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अत्यंत मूलभूत मानली जातात. या संशोधनाचा उपयोग सौर ऊर्जा, बॅटरीज आणि सेन्सर्स यांसारख्या उपकरणांमध्ये होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच. डी. केली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जर्मनीची डॅड फेलोशिप, इंग्लंडची इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सची फेलोशिप व दक्षिण कोरियाची ब्रेन पूल यांचा समावेश आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया, अलाहाबाद आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांचे ते फेलो आहेत. त्यांची चार आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या नावावर सात पेटंटही आहेत.
- मटेरियल सायन्समध्ये संशोधनाच्या व्यापक संधी
मटेरियल सायन्स हे माझ्या आवडीचे संशोधनाचे क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात दर्जेदार संशोधनकार्य करता आले. मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी असून भविष्यातही संशोधन करण्याचा प्रयत्न करीन. शिवाजी विद्यापीठ या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर आहे.ही आघाडी टिकविण्यासाठी नवसंशोधकांना प्रेरित करीत राहणे आवश्यक आहे.
–डॉ. पी. एस. पाटील (प्र–कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)
- शिवाजी विद्यापीठाची प्रतिष्ठा वृद्धिंगत
डॉ. पाटील यांचे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक कठोर परिश्रमाचे द्योतक नाही, तर शिवाजी विद्यापीठ परिवारासाठी आणि एकूणच भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाची प्रतिष्ठा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वृद्धिंगत झाली आहे. त्यांचे हे यश विद्यापीठातील युवा संशोधकांना दर्जेदार संशोधनासाठी प्रेरित करेल.
–डॉ. डी. टी. शिर्के (कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)








