वृत्तसंस्था / पॅरीस
फ्रान्समध्ये पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्च्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश मोडून मिरवणुका काढल्यास कठोर कारवाई आणि मोठा दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर भीषण आणि निर्घ्रूण हल्ला केल्यानंतर जगभरात या संघटनेविरोधात संतापाची भावना व्यक्त होत आहे. मात्र फ्रान्समधील मुस्लीम संघटनांनी हमासला समर्थन दिले आहे. फ्रान्समध्ये हमासच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. काही शहरांमध्ये पोलिसांनी घातलेली बंदी मोडली जात आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील ज्यू समाजाचे संरक्षण केले जाईल, असे प्रतिपादन केले आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाची झळ आपल्या देशातील ज्यूंना लागू देणार नाही. हमास समर्थकांनी त्यांचे धर्मांध साहस येथे दाखवू नये. तसे केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मॅक्रॉन यांनी दिला आहे.
ज्यूंची संख्या मोठी
फ्रान्समध्ये ज्यू लोकांची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची आहे. ज्यू लोकसंख्येच्या संदर्भात फ्रान्सचा क्रमांक इस्रायल आणि अमेरिकेच्या खालोखाल लागतो. जेव्हा ज्यू आणि अरब असा संघर्ष निर्माण होतो, तेव्हा फ्रान्समधील ज्यूंवर तेथील दहशतवादी मुस्लीमांकडून हल्ले होतात, असा अनुभव आहे. तो लक्षात घेऊन फ्रान्सने यावेळी दक्षता घेतली असून पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्च्यांवर बंदी घातली आहे. तरीही बंदी मोडून काही स्थानी निदर्शने होत आहेत. शनिवारी इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर त्वरित फ्रान्समध्ये हमासचे समर्थन करण्याची स्पर्धा मुस्लीम धर्मांध संघटनांमध्ये लागली आहे, अशी माहिती उपलब्ध आहे.









