वृत्तसंस्था/ रुरकेला
चौथ्या पराभवानंतर मनोबल खचलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा सामना आज बुधवारी ‘एफआयएच प्रो लीग’मध्ये अपराजित राहिलेल्या नेदरलँड्सशी होणार असून यावेळी आणखी एका खडतर लढतीची त्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघासाठी गेल्या काही दिवसांपासून वाटचाल खडतर राहिलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरल्यानंतर भुवनेश्वर आणि रुरकेला येथे सुरू असलेल्या प्रो लीगच्या सामन्यांमध्येही संघाची कामगिरी खराब झाली आहे. सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील संघ प्रो लीगमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळलेला आहे, त्यापैकी चार ते हरले आहेत आणि एक जिंकला आहे.
भारतीयांच्या मोहिमेची सुऊवात चीन (1-2), नेदरलँड्स (1-3), ऑस्ट्रेलिया (0-3) यांच्याविऊद्धच्या लागोपाठ तीन पराभवांनी झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेला 3-1 ने पराभूत केले. मात्र सोमवारी येथे झालेल्या लढतीत भारतीय संघाला चीनकडून (1-2) आणखी एकदा पराभूत व्हावे लागले. आजच्या लढतीतील भारतासमोरचे आव्हान जास्तच कठीण आहे. कारण बलाढ्या नेदरलँड्सचा सामना त्यांना करावा लागेल. नेदरलँड्सने 9 सामन्यांतून नऊ विजय मिळवून 27 गुणांसह ते आघाडीवर आहेत. तर भारतीय संघ सध्या नऊ संघांच्या गुणतालिकेत पाच सामन्यांतून केवळ तीन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
संगीता कुमारी, वंदना कटारिया, दीपिका, नवनीत कौर आणि सलीमा टेटे यांनी गोल नोंदविलेले असले, तरी भारतीय आघाडीफळीला आतापर्यंत आंशिक यश मिळाले आहे. पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याच्या बाबतीत येणाऱ्या अपयशाने त्यांना प्रो लीगमध्ये आणखी पेचात टाकले असून हीच त्रुटी त्यांना रांची येथे खेळविण्यात आलेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत महागात पडली होती. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमध्ये भारतीयांना 21 पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत, पण एकदाही त्यांना गोल करता आला नाही.
जर भारतीय संघाला डचना हादरा द्यायचा असेल, तर आज गुरजीत कौर, दीपिका आणि उदिता या खेळाडूंना अचूक लक्ष्यभेद करावा लागेल आणि नाविन्यपूर्ण असावे लागेल. त्याचप्रमाणे गोल स्वीकारणे टाळण्यासाठी भारतीय महिलांनी पेनल्टी कॉर्नरवरचा बचाव अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.









