जर्मनी संघात नवोदितांचा भरणा असल्याने भारताला विजयाची संधी
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारत व जर्मनी यांच्यात एफआयएच प्रो लीग हॉकी लढतीतील पहिला सामना गुरुवारी येथील कलिंगा स्टेडियमवर होणार असून आघाडीचे स्थान आणखी भक्कम करण्यासाठी भारतीय संघ अनुभव व होम ऍडव्हांटेजचा लाभ उठविण्याचा प्रयत्न या लढतीत करेल.
प्रो लीगच्या गुणतक्त्यात भारतीय पुरुष संघ दहा सामन्यांतून 21 गुण घेत आघाडीवर असून दुसऱया स्थानावरील जर्मनीने आठ सामन्यांत 17 गुण घेतले आहेत. या लढतीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला फेव्हरिट मानले जात असून जर्मनी संघात 12 नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या 22 पैकी सहा खेळाडूंना वरिष्ठ संघात 14 व 15 रोजी होणाऱया लढतीत पदार्पणाची संधी मिळणार असून या सामन्यांत युवा खेळाडूंची चाचणी घेण्याचा निर्णय जर्मनी संघाने घेतला आहे. पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा तसेच 2024 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ध्यानात घेत ते नवीन खेळाडूंना आजमावून पाहत आहेत.
नियमित वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नसणे, हे देखील नवोदित खेळाडूंना उतरवण्याचे एक कारण आहे. जर्मनीतील क्लबस्तरीय स्पर्धेत खेळत असल्याने वरिष्ठ खेळाडू या लढतीसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. भारतीय संघाला या गोष्टीचा लाभ उठवण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे. भारताने अलीकडेच झालेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत प्रथम 2-1 असा विजय मिळविला तर परतीच्या दुसऱया सामन्यात भारताला त्यांच्याकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या संमिश्र कामगिरीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे.
जर्मनीविरुद्ध होणारे हे दोन सामने भारतात होणारे प्रो लीगचे शेवटचे सामने आहेत. यानंतर त्यांना विदेशातील लढतीत भाग घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून मायदेशातील लीग टप्प्याची सांगता विजयानेच करण्याचा निर्धार अमित रोहिदासच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा असेल.
मात्र उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने सावधानतेचा इशारा आपल्या सहकाऱयांना दिला आहे. ‘जर्मनी संघात नवोदितांचा भरणा असला तरी त्यांच्याविरुद्ध गाफील राहून चालणार नाही. कारण युवा खेळाडू आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी अशा संधीचा पुरेपूर लाभ उठवण्याकरिता कठोर मेहनत घेतात. त्यामुळे सांघिक कामगिरी सुधारण्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज असून प्रतिस्पर्धी कोण आहे, याचा विचार न करता खेळावर लक्ष पुरवायला हवे. प्रतिस्पर्धी अनुभवी असतो तेव्हा त्यांची ताकद, कच्चे दुवे यांची जाणीव होऊ शकते. पण नवोदितांना सामोरे जाताना त्यांचे बलस्थान किंवा कच्चे दुवे यांची काहीच माहिती नसते, अशावेळी आम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे जर्मनीचा खेळ कसा असतो आणि त्यांची योग्यता काय, त्यांची खेळण्याची स्टाईल यांची आम्हाला कल्पना आहे. त्यानुसारच आम्हाला डावपेच आखावे लागतील,’ असे तो म्हणाला.
वातावरणाशी जुळवून घेणे हे आपल्या संघासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. कारण आम्ही सब झिरो तापमानातून येथे आलो असून येथील उष्ण व दमट हवामानात खेळ करणे आमच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या लढतीतून शिकणे व विकसित होणे, यावर आमचे पूर्ण लक्ष केंद्रित असेल. आमचा हा आजवरचा सर्वात तरुण संघ असून भविष्यातील संघ, याच नजरेतून आम्ही त्यांच्याकडून तयारी करवून घेत आहोत. आम्ही आतापासूनच 2028 ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केले आहे, असे जर्मनी संघाचे प्रमुख प्रशिक्षक आंद्रे हेनिंग म्हणाले. मात्र आपल्या खेळाडूंनी अपेक्षेहून चांगली कामगिरी केली तर त्याचे आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.









