वृत्तसंस्था/दुबई
यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यांना 3.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळणार असून मागील आवृत्तीत देण्यात आलेल्या बक्षिसापेक्षा ते दुप्पट आहे. 2023 मध्ये भारताविऊद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 1.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले होते. यावेळच्या स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळविला जाईल. पराभूत होणाऱ्या संघाला 2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील. मागील दोन आवृत्त्यांमधील उपविजेत्यांना 8 लाख अमेरिकन डॉलर्स मिळाले होते.
बक्षिसांच्या रकमेत झालेली वाढ या नऊ संघांच्या स्पर्धेच्या पहिल्या तीन आवृत्त्यांच्या गतीच्या आधारे कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याचे आयसीसीचे प्रयत्न दाखवून देते, असे आयसीसीने गुऊवारी एका निवेदनात म्हटले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका आणि पाकिस्तानवर 2-0 ने घरच्या मालिका जिंकून अव्वल स्थान मिळविले आणि त्यांच्या मोहिमेची समाप्ती 69.44 टक्के गुणांनी झाला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 67.54 गुणांसह अंतिम फेरी गाठली आहे, तर भारताला गुणतालिकेत बराच काळ अव्वल राहिल्यानंतर 50 गुणांवर समाधान मानावे लागेल.
जागतिक कसोटी स्पर्धेच्या जेतेपदाचे रक्षण करण्याची संधी, तिही विशेषत: लॉर्ड्सवर मिळाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. गेल्या दोन वर्षांत अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्व खेळाडूंनी घेतलेल्या अविश्वसनीय परिश्रमांची ही साक्ष आहे. हा आम्हा सर्वांसाठी एक मोठा सन्मान आहे, असे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले आहे. प्रत्येकाला कसोटी क्रिकेटचे महत्त्व समजते आणि जागतिक कसोटी स्पर्धेचे अजिंक्यपद अधिकच महत्त्वपूर्ण आहे. या महालढतीसाठी लॉर्ड्स हे एक योग्य ठिकाण आहे आणि आम्ही सर्व जण ऑस्ट्रेलियाविऊद्ध आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करू, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने म्हटले आहे.









