पंतप्रधान मोदी यांचे एसियानमध्ये भाषण, संघटनेच्या प्रगतीचा आढावा
वृत्तसंस्था /जकार्ता
कोरोना नंतरच्या काळात जगाला एका नियमबद्ध आणि नव्या व्यवस्थेची आवश्यकता आहे. अशी व्यवस्था निर्माण करण्यात एसियान ही संस्था महत्वाची भूमिका साकारणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे एसियान शिखर परिषदेत भाषण करीत होते. 21 वे शतक हे आशिया खंडाचे शतक आहे. आशिया खंडातील देशांना वेगाने प्रगती साधायची असेल तर कोरोना नंतरच्या काळात एक नवी विश्वव्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. एसिआन ही संघटना आशियातील एक प्रबळ गट असून दक्षिण गोलार्धाचा आवाज जगात बुलंद करणे हे या संघटनेचे ध्येय आहे. भारताच्या ‘पूर्वाभिमुख’ धोरणाचा ही संघटना एक महत्वाचा स्तंभ आहे. एसियान देश आणि भारत यांच्यात प्रबळ ऐतिहासिक आणि भौगोलिक संबंध आहेत. सामायिक मूल्ये, प्रादेशिक एकता, शांतता, भरभराट आणि परस्परांवर विश्वास ही या संबंधांची मूलतत्वे आहेत. भारताच्या प्रशांत-भारतीय धोरणात या संघटनेचे अनन्यसाधारण महत्व आहे, अशी भलावणही त्यांनी भाषणात केली.
उज्ज्वल भविष्याच्या दिशेने
भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये आम्ही या संघटनेसह एकत्र काम करण्यास सज्ज आहोत. यामुळे मानवतेची उन्नती होईल, अशी आमची अपेक्षा आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळातही प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगती साध्य करीत आहोत. यातून भारत आणि एसियान यांच्यातील दृढबंधांचे दर्शन घडते. वसुधैव कुटुंबकम्, अर्थात एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्वानुसार हे संबंध विकसित होत आहेत. जी-20 परिषदेचेही हेच तत्व आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
चीनला अप्रत्यक्ष इशारा
नुकताच चीनने आपला नवा नकाशा प्रसिद्ध केला आहे. या नकाशात दक्षिण चीन समुद्र त्याने आपला म्हणून दाखविला आहे. त्यामुळे व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि मलेशिया या देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना प्रशांत महासागरीय प्रदेशातील मुक्त संचाराची आवश्यकता प्रतिपादित केली. या प्रदेशातील देश प्रगती, शांतता आणि सुरक्षा यांचे महत्व अधिक वाटते. त्यांच्या भावनांचा अनादर कोणत्याही देशाने करु नये, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी भारतात परतले
आपला लघुकालीन इंडोनेशिया दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. 9 सप्टेंबरपासून दिल्लीत जी-20 शिखर परिषदेचा प्रारंभ होत आहे. आज शुक्रवारपासून राष्ट्रप्रमुखांचे आगमन होणार आहे. आज शुक्रवारीच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात चर्चा होणार आहे.









