दाभाळ : ग्रामीण भागातील विविध संस्थाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनातून ग्रामीण भागातील मुलांना, महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपब्लध होते. या संधीचा लाभ गावातील महिलांनी, मुलांनी आवर्जुन घ्यावा व आपले कला, कौशल्य विकसित करावे, असे प्रतिपादन सरपंच उमेश गावडे यांनी बेतोडा येथे केले. तळयेवाडा, बेतोडा येथील आझाद क्रीडा आणि सांस्कृतिक संघाच्या 16 व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक सलीम रयानी, समाजसेवक आदर्श तोरस्कर, प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका गीता धारगळकर, सदानंद गावकर, सत्कारमूर्ती झिंगडू गावडे, रत्नाकांत गावडे, क्लबचे अध्यक्ष विनोद बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण संस्थांनी क्रीडा स्पर्धापुरते मर्यादित न राहता इतर सामाजिक उपक्रम हाती घेऊन आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी परिश्रम घ्यावे असे सरपंच उमेश गावडे पुढे बोलताना म्हणाले. मागील 16 वर्षे सातत्याने आझाद संघ या भागात चांगले कार्य करीत आहे. त्यांनी हे कार्य असेच पुढे न्यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला व संघाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
ग्रामीण भागातील मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी अशी स्नेहसंमेलने खूप उपयुक्त ठरतात. मुलांना व्यक्त होण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होते. अशा स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे शिक्षिका गीता धारगळकर यांनी सांगितले. ग्रामीण संस्थांनी स्वत:पुरते मर्यादित न राहता समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत राहावे व नावलौकिक मिळवावे असे आदर्श तोरस्कर यांनी सांगितले. सदानंद गांवकर यांनी संघाच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. संघातर्फे वर्षभरातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. संघाच्या कार्यात भरीव योगदान दिलेल्या झिंगडू गावडे व रत्नाकांत गावडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांची ओळख, स्वागत व सूत्रसंचालन गौरव गांवकर यांनी केले. सर्वेश गावडे यांनी आभार मानले.









