छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती-रोख रक्कम देऊन सन्मान
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी आचार्य गल्ली, शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात पार पडला. श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, सुबोध गावडे व आचार्य गल्ली येथील पंच राजेश हंडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विजेत्या स्पर्धकांचा आनंद गगनात मावणारा नव्हता.
तरुणांना मार्गदर्शन करताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. सध्याच्या तरुणांना स्वराज्याची निर्मिती करायची नसून अभ्यासात चांगले गुण मिळवून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करायचे आहे. तरुणांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी लोकमान्य सोसायटीने दिवाळी किल्ला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिवरायांच्या पैलूंची माहिती मिळेल व ते पुढील आयुष्यात जोमाने कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पंढरी परब म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. हा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी लोकमान्य सोसायटीने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे नेटके नियोजन असल्यामुळे भरपावसातही 67 हून अधिक मंडळांनी स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. लोकमान्य सोसायटीने सामाजिक जबाबदारी म्हणून किल्ला स्पर्धांसारखे अनेक उपक्रम राबवून समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. त्यानंतर विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. शिवचरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती व रोख रक्कम देऊन विजेत्यांचा सन्मान झाला. ही स्पर्धा अनगोळ, बेळगाव, शहापूर, टिळकवाडी व वडगाव या विभागांमध्ये झाली होती. विजेत्या स्पर्धकांनी जोरदार जल्लोष केला. गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण करणाऱ्यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन राजू नाईक यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने युवक व बालचमू उपस्थित होते.









