वृत्तसंस्था/ ओर्लेन्स (फ्रान्स)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सुपर-300 दर्जाच्या न्यू ओर्लेन्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रियांशू राजवतने पुरुष एकेरीची उपांत्यफेरी गाठली.
शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या प्रियांशू राजवतने चीन तैपेईच्या चि यु जेनचा 21-18, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेत राजवतने यापूर्वीच्या फेरीतील सामन्यात जपानच्या टॉप सीडेड आणि जागतिक मानांकन क्रमवारीतील 12 व्या स्थानावर असलेल्या निशिमोटोचा पराभव केला होता. आता राजवतचा उपांत्य फेरीतील सामना आयर्लंडच्या नेगुयेनशी होणार आहे. प्रियांशू राजवतने जपानच्या निशिमोटोचा 21-8, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करून पुढील फेरी गाठली होती. उपांत्यफेरीत राजवतशी गाठ पडलेल्या आयर्लंडच्या नेगुयेनला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इस्त्रायलच्या झिलबरमनकडून पुढे चाल मिळाली.
या स्पर्धेत महिला एकेरीत मात्र भारताच्या सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. तुर्कीच्या निसिलहेन ईगेटने केवळ 39 मिनिटात सायनाचा 21-16, 21-14 असा फडशा पाडत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.









