वृत्तसंस्था/ लिमेरिक (आयर्लंड)
येथे सुरू असलेल्या विश्व युवा चॅम्पियनशिप तिरंदाजी स्पर्धेत 21 वर्षाखालील वयोगटात भारताचा प्रियांशने कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात तर महिलांच्या 21 वर्षाखालील वयोगटात वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात आदिती गोपीचंद स्वामी विजेते ठरले आहेत.
पुरुषांच्या 21 वर्षाखालील वयोगटातील कंपाऊंड तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात भारताच्या प्रियांशने स्लोवेनियाच्या अल्जाझ ब्रेंकचा 147-141 अशा गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. तसेच महिलांच्या 18 वर्षाखालील कंपाऊंड तिरंदाजी वैयक्तिक प्रकारात आदिती गोपीचंद स्वामीने अंतिम लढतीत अमेरिकेच्या लीन ड्रेकचा 142-136 अशा गुणांनी पराभव केला. आदिती गोपीचंद स्वामीनी पहिल्यांदाच या स्पर्धेत वरिष्ठ गटात पदार्पण केले होते. गेल्या महिन्यात कोलंबिया येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत आदितीने सांघिक गटातून कास्यपदक मिळवले होते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी शारजाह येथे झालेल्या आशिया चषक तिसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी स्पर्धेत आदितीने वैयक्तिक गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचे तिसरे पदक थोडक्यात हुकले. भारताच्या अवनीत कौरला ब्रिटनच्या हॅली बोल्टनकडून ट्रायब्रेकरमध्ये हार पत्करावी लागली होती. आयर्लंडमधील स्पर्धेत आतापर्यंत भारताने एकूण 9 पदकांची कमाई केली असून त्यात 1 रौप्य आणि 3 कास्यपदकांचा समावेश आहे. पोलंडमध्ये 2021 साली झालेल्या विश्व युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 8 सुवर्णपदकांसह एकूण 15 पदकांची कमाई केली होती.









