भाजप सरकारने दीड लाख कोटी रक्कम लुटली, राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार अस्तित्वात
विशेष प्रतिनिधी/ दांडेली
सध्या कर्नाटकात 40 टक्के ‘कमिशन’चे सरकार अस्तित्वात आहे. हे सरकार जनतेला लुटत आहे. ‘हम भ्रष्टाचार करेंगे खुल के करेंगे, लुटेंगेही नही खुल के लुटेंगे’ हे सरकारचे धोरण बनले आहे. आतापर्यंत कर्नाटकातील भाजप सरकारने दीड लाख कोटी इतकी रक्कम लुटली आहे. भाजप नेते लुटलेल्या रकमेतून रस्ते, शिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था आदी पायाभूत सुविधा उभारू शकले असते. मात्र, त्यांनी ही रक्कम लूटली, असा घणाघाती आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियांका गांधी यांनी केला.
शनिवारी सायंकाळी दांडेली येथे हल्याळ-जोयडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना उद्देशून बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, आमच्या देशाचे पंतप्रधान वाघ पाहण्यासाठी दिल्लीहून कर्नाटकात दाखल होतात. तथापि, त्यांना राज्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांच्या दौऱ्यात वाढ झाली आहे. कर्नाटकमध्ये राजरोसपणे लूट होत असल्याची तक्रार कर्नाटकातील ठेकेदारांनी पंतप्रधानांना केली आहे. तथापि ठेकेदारांच्या तक्रारीची दखल अद्याप पंतप्रधानांनी घेतलेली नाही. कर्नाटकातील आमदाराच्या पुत्राच्या घरात 8 कोटी रुपये आढळून येतात. संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही. उलट या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असलेले आमदार महाशय काही दिवसांनी प्रकट होतात आणि शो द्वारे शक्ती प्रदर्शन करतात. याला काय म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित करून प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या.
दांडेली येथे सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने वास्तव्य करून आहेत ही अतिशय समाधानकारक बाब आहे. तथापि काही जण आपला लाभ उठविण्यासाठी देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकापासून सावध राहिले पाहिजे. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला जनतेच्या मुद्द्यांचा विसर पडला आहे. बेरोजगारीने कहर केला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. कापूस, ऊस आदी नगदी पिकांना योग्य दर मिळेनाशी परिस्थिती आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गरीब जनतेला मोफत तांदूळ देण्याची योजना सुरू केली होती. तथापि भाजप सरकारकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविला जात आहे. भाजप सरकारने महिलांसाठी 24 आश्वासनांची घोषणा केली होती. तथापि केवळ दोन योजनांची पूर्तता केली आहे. कर्नाटकात होत असलेली लूट रोखण्यासाठी आणि शक्तिशाली कर्नाटक निर्मितीसाठी यावेळी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले.
समाजस्वास्थ्य बिघडविण्यात भाजप नेहमीच पुढे
केंद्र आणि राज्य सरकारमुळे या देशातील व राज्यातील जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन आवश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गरिबांचे जगणे मुश्कील झाले आहे. विकासाकडे दुर्लक्ष, जाती, धर्मांमध्ये विष कालवून संघर्ष निर्माण करून समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्यात भाजप नेहमीच पुढे आहे, असा आरोपही प्रियांका गांधी यांनी केला.
योळी काँग्रेसचे उमेदवार आर. व्ही. देशपांडे यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद, काँग्रेस जिल्हाध्यक्ष साई गावकर, देशपांडे यांचे पुत्र प्रशांत देशपांडेंसह अन्य नेते उपस्थित होते. सभेला हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
कुंदगोळ येथे प्रियांका यांचा भव्य रोड-शो
हुबळी : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शनिवारी कुंदगोळमध्ये भव्य रोड-शो करण्याद्वारे मतदारसंघातील उमेदवार कुसूमावती शिवळ्ळी यांच्यातर्फे जोरदार प्रचार केला. शहरातील प्रमुख मार्गावरून 1 किलो मीटरपर्यंत रोड-शो केला. यावेळी उन्हाची पर्वा न करता कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रोड-शो मध्ये विविध कलापथके सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कुसूमावती शिवळ्ळी यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले.