वृत्तसंस्था/ वायनाड
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा यांचा 12 दिवसांचा वायनाड दौरा सध्या चर्चेत आहे. खास बाब म्हणजे या दौऱ्यादरम्यान त्या गर्दीयुक्त कार्यक्रमात सामील झाल्या नाहीत तसेच स्थानिक काँग्रेस शाखा त्यांच्या कार्यक्रमांशी जोडली गेलेली नाही. प्रियांका यांच्या या दौऱ्यात शुक्रवारी सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जोडले गेले होते. प्रियांका वड्रा या 11 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत स्वत:च्या लोकसभा मतदारसंघात आहेत. परंतु त्यांच्या बहुतांश गाठीभेटी आणि कार्यक्रम पक्षाच्या संरचनेबाहेरील आहेत.
आम्हाला प्रियांका वड्रा यांच्या कार्यक्रमांची माहिती दिली जात नाही, सर्वकाही त्यांच्या कार्यालयातून ठरते, त्या स्थानिक राजकारणात सामील होऊ इच्छित नाहीत अशी तक्रार वायनाड काँग्रेस जिल्हाप्रमुख एन.डी. अप्पाचन यांनी केली आहे.
प्रियांका वड्रा यांचा हा दौरा वेळेनुसार योग्य नाही, कारण विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. वायनाडमधील 7 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफकडे आहेत. राज्यातील सत्तारुढ डाव्या सरकारवर हे अधिवेशन दबाव निर्माण करण्याची संधी आहे, अशास्थितीत स्थानिक नेत्यांचे लक्ष वायनाडवर विभागणे पक्षांसाठी असुविधाजनक मानले जात नसल्याचे काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी मान्य केले आहे.
प्रियांका यांनी मागील आठवड्यात अनेक धार्मिक नेते, लेखक, भूसंरक्षक चेरुवायल रामन यासारख्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि भूस्खलन पीडितांची भेट घेतली होती. सुल्तान बथेरीमध्ये एका अंगणवाडीचे उद्घाटन करत प्रियांकांनी मुलांच्या पसंतीनुसार खेळणी खरेदी करून त्यांना दिली होती.
नीलांबुरमध्ये रेल्वेस्थानक विकाससंबंधी मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आणि कटनायक्कन आदिवासी समुदायाशी संवाद साधला होता. तर मुत्तिल येथील वायनाड मुस्लीम ऑर्फनेजला भेट प्रियांका वड्रा यांनी दिली होती, परंतु या कार्यक्रमाची माहिती काँग्रेसचा सहकारी आययूएमएलला देण्यात आली नव्हती. प्रियांका यांनी शुक्रवारी चूंडले येथील कॉफी बोर्डाच्या क्षेत्रीय संशोधन केंद्र आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फौंडेशनचाही दौरा केला होता.
काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य रमेश चेन्निथला हे वायनाडमध्ये ‘ड्रग्जविरोधी मोर्चा’ काढत असताना प्रियांका आणि सोनिया तेथून गेल्या, परंतु मोर्चात सामील झाल्या नाहीत. प्रियांकांनी मोर्चात भाग घेतला असता तर कार्यकर्त्याचे मनोबल वाढले असते. तसेच प्रियांका यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच स्थानिक काँग्रेस नेते जेस नेल्लेदम यांनी आत्महत्या केली होती. तर अन्य स्थानिक नेते थँकाचन यांना अटक झाली होती. याचदरम्यान काँग्रेस नेते एम.एन. विजयन यांची स्नुषा पद्मजा यांनी आत्महत्येच प्रयत्न केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थिती सांभाळण्यासठी काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि प्रदेशाध्यक्ष सनी जोसेफ यांनी जिल्हा काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली आहे.









