जॉन सीना अन् इद्रिस एल्बासोबत झळकणार
प्रियांका चोप्रा स्वतःच्या ओटीटी पदार्पणासाठी सज्ज आहे. तिची स्पाय थ्रिलर वेबसीरिज ‘सिटाडेल’ अमेझॉन प्राइमवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजकरता प्रियांका मुंबईत जोरदार प्रमोशन करत आहे. याचदरम्यान प्रियांकाला अमेझॉन स्टुडिओजचा एक प्रोजेक्ट मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेता जॉन सीना आणि इद्रिस अल्बा यांच्यासोबत प्रियांका आता ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्ये दिसून येणार आहे.

प्रियांकाचा नवा चित्रपट ‘हेड ऑफ स्टेट्स’चे चित्रिकरण मे महिन्यात सुरू होणार आहे. याचे दिग्दर्शन नोबडी फेम इल्या नॅशुलर करणार आहेत. या चित्रपटाची कहाणी जोश एपेलबाउम आणि आंद्रे नेमेक यांनी लिहिली आहे. हॅरिसन क्वेरी यांच्या कहाणीवर हा चित्रपट आधारित असणर आहे.

‘सिटाडेल’ बरोबरच प्रियांका स्वतःचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘लव्ह अगेन’च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात तिच्यासोबत सॅम ह्यूगन अन् सेलीन डायोन हे कलाकार दिसून येतील. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. प्रियांका याचबरोबर एंथोनी मॅकीसोबत ‘एंडिंग थिंग्स’ नावाच्या चित्रपटात काम करत आाहे. तर फरहान अख्तरचा बॉलिवूड चित्रपट ‘जी ले जरा’मध्ये प्रियांका मुख्य भूमिकेत असणार आहे.
प्रियांकाच्या ‘सिटाडेल’ या सीरिजचे पहिले दोन एपिसोड्स 28 एप्रिल रोजी 40 भाषांमध्ये जागतिक स्तरावर अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होतील. उर्वरित एपिसोड्स पुढील काळात प्रदर्शित केले जाणार आहेत.









