गेहलोत-बघेल यांच्याकडेही मोठी जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक जागा मानल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीची जागा जिंकण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पक्षाने लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना रायबरेली आणि के. एल. शर्मा यांना अमेठी मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव झाला होता. आता या जागा जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाने विशेष नियोजन सुरू केले आहे. दोन्ही मतदारसंघातील पक्षांतर्गत हालचालींवर प्रियांका गांधी यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याशिवाय अशोक गेहलोत आणि भूपेंद्र बघेल या दोन राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांकडेही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. या दोन जागांसाठी पक्षाने दोन माजी मुख्यमंत्र्यांना निरीक्षक बनवले आहे. अमेठीतून अशोक गेहलोत आणि रायबरेलीमधून भूपेश बघेल यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दोन्ही नियुक्त्यांना हिरवा झेंडा दाखविला आहे.
काँग्रेस या जागांवर कोणतीही कसर सोडू इच्छित नसल्यामुळे यावेळी प्रियांका गांधी वढेरा स्वत: अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. 18 मे पर्यंत प्रियांका या दोन जागांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. सक्रिय राजकारणात आल्यानंतर पहिल्यांदाच पक्षासाठी या दोन जागा जिंकण्याची जबाबदारी प्रियांकाच्या खांद्यावर देण्यात आली आहे.









