काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक वाराणसी या पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातून लढवली तर धक्कादायक निकाल लागून प्रियंका गांधी-वाड्रा विजयी होतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “भारतातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. काँग्रेसला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढल्या तर पंतप्रधान मोदींना निवडणूक जिंकणे कठीण जाईल. तसेच प्रियंका त्यांच्यावर विजयही मिळवू शकतात.” असा दावा राऊत यांनी केला आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप- शिवसेना युती तोडल्याबद्दल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केल्यावर संजय राऊत यांनी पंतप्रधानांवरही टीका केली. ते म्हणाले “पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी 2014 मध्ये युती तोडल्याचे म्हटले आहे. ते खोटे बोलत आहेत कारण महाराष्ट्रातील सर्वांनाच माहित आहे की भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांनी ठाकरेंना फोन करून युती तोडण्याच्या भाजपच्या निर्णयाची माहिती दिली होती.” असा खुलासाही त्यांनी केला.