बॉलिवूडची देसी गर्ल सध्या भारतात आहे. प्रियांका चोप्रा तीन वर्षांनी भारतात आली आहे. प्रियांकाने भारतातील दौऱयादरम्यान चाहत्यांना खूषखबर दिली आहे. प्रियांकाने ‘आउटलँडर’ फेम अभिनेता सॅम ह्यूगन आणि सलीन डियोन सोबतचा हॉलिवूडपट ‘लव्ह अगेन’ची घोषणा केली आहे. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

स्कॉटलंडचा अभिनेता आणि ‘द स्पाय हू डम्प्ड मी’ यासारख्या चित्रपटांमधून चर्चेत आलेल्या सॅम ह्युगननेही नव्या चित्रपटासंबंधी पोस्ट केला आहे. जिम स्ट्राउजच्या या चित्रपटात प्रियांकाच्या व्यक्तिरेखेचे नाव मीरा रे आहे. मीराच्या प्रियकराचा मृत्यू झालेला असतो. या दुःखाला सामोरी जाणारी मीरा त्यायच जुन्या मोबाइल क्रमांकावर सातत्याने मेसेज करत असते. प्रत्यक्षात हे मेसेज रॉब बर्न्स म्हणजेच सॅमच्या व्यक्तिरेखेला मिळत असतात. मेसेज वाचून रॉब आता मीराला भेटू इच्छित असतो. यात तो सलीम डियोनची मदत घेत असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
प्रियांका चोप्रा याचबरोबर ‘सिटाडेल’ या ऍक्शन धाटणीच्या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. याचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. तसेच ती लवकरच फरहान अख्तर आणि जोया अख्तर यांचा चित्रपट ‘जी ले जरा’च्या चित्रिकरणात सामील होणार आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट दिसुन येणार आहे.









