केरळला चोख प्रत्युत्तर, गुजरात 1 बाद 222, देसाईचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातचा अनुभवी फलंदाज प्रियांक पांचाळने नाबाद शतक नोंदवल्यानंतर रणजी करंडक उपांत्य लढतीच्या तिसऱ्या दिवशी 1 बाद 222 धावा जमवित केरळला चोख प्रत्युत्तर दिले. पांचाळ 117 धावांवर खेळत आहे.
केरळने पहिल्या डावात 457 धावा जमविल्या असून गुजरात अद्याप 235 धावांनी पिछाडीवर आहे. मोटेराच्या पाटा खेळपट्टीवर गुजरातच्या फलंदाजांनी कडवा प्रतिकार केला. केरळने संथ फलंदाजी केल्याने आता आणखी शंभर धावा कमी पडल्या, असे वाटत आहे. केरळने 7 बाद 417 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि आणखी 39 धावांची भर घालत 457 धावांवर त्यांचा डाव आटोपला. मोहम्मद अझहरूद्दिन 177 धावांवर नाबाद राहिला. त्याने 20 चौकार, एक षटकार ठोकत कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
पांचाळ व आर्य देसाई यांनी गुजरातच्या डावाला दमदार सुरुवात करून देताना 131 धावांची सलामी दिली. देसाईने 118 चेंडूत 11 चौकार, एक षटकारासह 73 धावा काढल्या. मात्र यानंतर केरळच्या गोलंदाजांना यश मिळविता आले नाही. पांचाळने प्रथमश्रेणीतील 29 वे व या मोसमातील दुसरे शतक 155 चेंडूत पूर्ण केले. सरवटेला षटकार ठोकत त्याने शतक गाठले. हिंग्राजियाने पांचाळला चांगली साथ देत नाबाद 30 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक : केरळ प.डाव 457 (अझहरूद्दिन नाबाद 177, सचिन बेबी 69, सलमान निझार 52, नागवासवाला 3-81, चिंतन गजा 2-75), गुजरात प.डाव 71 षटकांत 1 बाद 222 (प्रियांक पांचाळ खेळत आहे 117, आर्य देसाई 73, मनन हिंग्राजिया खेळत आहे 30).









