आदित्य इंगळेकडून चित्रपटाचे दिग्दर्शन
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा मराठी चित्रपट येत्या 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक असे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रिया आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सहजसुंदर केमिस्ट्रीमुळे त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी या दोघांची मुख्य कलाकार म्हणून का निवड केली हे स्पष्ट केले आहे. उमेशचा सहजपणा, गंमतीशीर स्वभाव अन् प्रियाची शिस्त पाहून त्यांच्यात माझ्या कथेची पात्रं दिसली. ते या पात्रांकरता इतके योग्य वाटत होते की, त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही असे मला वाटले. म्हणून मी त्यांना या चित्रपटासाठी विचारलं, त्यांना कथा ऐकविली, यावर प्रियाने गंमतीने ‘तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना, अशी विचारणाही केली. खरं तर या व्यक्तिरेखा आधीच लिहिल्या होत्या आणि ते दोघं याकरता योग्य वाटल्याचे आदित्यने सांगितले आहे. गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांची लोकप्रिय जोडी देखील चित्रपटात झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या रंगतदार अभिनयामुळे ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेन्मेंट आणि एस.एन. प्रॉडक्शन्सकडून निर्मित हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे.









