मनीष पॉल बहुरंगी भूमिकेत
रफूचक्कर या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजसोबत मनीष पॉल ओटीटी पदार्पण करणार आहे. सीरिजचे दिग्दर्शन ऋतम श्रीवास्तव यांनी केले आहे. या सीरिजमध्ये मनीषसोबत प्रिया बापट, संतोष सिंह, आकाश दाहिया आणि अक्षा पर्दासनी हे कलाकार दिसून येणार आहेत. गुमराह चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री चाहत विग देखील या सीरिजमधून स्वत:चे ओटीटी पदार्पण करणार आहे.
प्रिया बापटने या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची कधी अपेक्षा करता आली नाही, ते आता घडण्याची अपेक्षा करा, कारण आमचे मन आणि मेंदूला रफूचक्कर करण्यासाठी प्रिन्स येतोय असे तिने याच्या कॅप्शनदाखल नमूद पेले आहे.

सीरिजच्या ट्रेलरमध्ये मनीष पॉल विविध वेशांमध्ये दिसून येत आहे. यात तो कधी फिटनेस ट्रेनर तर कधी वेडिंग प्लॅनरच्या भूमिकेत दिसेल. वेबसीरिजचे चित्रिकरण नैनीताल आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये झाले आहे. सीरिजमध्ये डीप फेक, फेस मॅपिंग आणि डिजिटल फूटप्रिंट यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर चित्रित करण्यात आला आहे.
रफूचक्कर ही सीरिज 15 जूनपासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. याची निर्मिती ज्योति देशपांडे यांनी केली आहे. प्रिया बापटने यापूर्वी सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसीरिजद्वारे देशभरात स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. प्रियाला आता स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याची संधी चालून आली आहे.









