सुटीबाबत गैरसमज असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी
बेळगाव : दसरा सुटीनंतर बुधवारी विनाअनुदानित तसेच खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला. सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने सरकारी व अनुदानित शाळांच्या सुटीत वाढ केली असली तरी विनाअनुदानित व खासगी शाळा बुधवारपासून भरविण्याचे आदेश होते. त्यानुसार शाळा भरविण्यात आल्या. परंतु सुटीबाबत बरेच गैरसमज असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. यावर्षी 21 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दसरोत्सवाची सुटी देण्यात आली होती. बुधवारपासून शाळा सुरू होणार असल्याने मागील दोन दिवसांपासून शाळांच्या स्वच्छतेचे काम सुरू होते. मंगळवारी वाल्मिकी जयंती असल्यामुळे शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे शाळेमध्ये येऊन शिक्षकांनी स्वच्छता मोहीम राबविली. बुधवारी सकाळपासून शाळेच्या नियमित वेळेत वर्ग भरविण्यात आले. पहिल्याच दिवशी वेळेत वर्गात पोहोचण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू होती. तसेच रिक्षा व स्कूल बस पुन्हा एकदा गल्लोगल्ली फिरताना दिसून आले. दसरा सुटीत दिलेला गृहपाठ बुधवारी तपासण्यात आला. त्यामुळे विनाअनुदानित व खासगी शाळा परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.
शाळा सुटीबाबत संभ्रमाचे वातावरण
राज्यात सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण केले जात आहे. वास्तविक हे सर्वेक्षण मंगळवारपर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु मध्यंतरी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षणाचे काम रखडले. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम पूर्ण झाले नाही. शिक्षक सर्वेक्षणात गुंतले असल्याने राज्य सरकारने सरकारी व अनुदानित सरकारी शाळांची सुटी वाढविली. परंतु याबाबत मंगळवारी रात्रीपर्यंत निश्चिती नसल्याने पालकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे बुधवारी खासगी शाळांमध्ये उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले.









