सुट्यांच्या कालावधीत प्रवाशांची लूट : प्रशासनाने चाप लावण्याची मागणी
बेळगाव : उन्हाळी सुट्यांमुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, रेल्वे तसेच परिवहन मंडळाच्या बस मर्यादित असल्याने खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी कारभार सुरू आहे. सलग सुट्यांमुळे ट्रॅव्हल्सचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जात आहेत. बेळगाव-मुंबई या मार्गावर ट्रॅव्हलचा दर 1700 ते 2200 पर्यंत पोहोचला होता. यामुळे ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्यांची लूट होत असल्याने प्रशासनाने यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. बेळगाव शहरातील अनेक विद्यार्थी, नागरिक, शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, हैद्राबाद, बेंगळूर, मंगळूर, म्हैसूर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना शनिवारी सुटी असते. गुड फ्रायडे शुक्रवारी आल्याने त्या दिवशी सरकारी सुटी होती. शनिवार व रविवार साप्ताहिक सुट्या असल्याने आयटी तसेच इतर कंपन्यांमध्ये काम करणारे नागरिक बेळगावमध्ये आले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी सायंकाळनंतर ते माघारी फिरले.
बेळगावमधून बेंगळूरला जाण्यासाठी दोन ते तीन रेल्वेंचा पर्याय असल्याने तसेच एक जादा रेल्वे सोडल्यामुळे बेंगळूर शहराला जाणाऱ्या नागरिकांना तितकासा त्रास झाला नाही. परंतु, मुंबई, पुणे व हैद्राबाद येथे जाणाऱ्यांचे हाल झाले. रेल्वेचे बुकिंग काही दिवसांपूर्वीच फुल्ल झाले होते. तर केएसआरटीसीच्या ऐरावत, पालखी यासह आराम बसदेखील बुकिंग होत्या. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागला. एरव्ही बेळगावमधून मुंबईला जाण्यासाठी हजार ते बाराशे रुपये तिकीट दर आकारला जातो. सध्या मात्र तो 1700 ते 2200 पर्यंत पोहोचला आहे. बेळगाव-पुणे या दरम्यान रविवारी प्रवास करणाऱ्यांना तब्बल 1200 ते 1800 रुपये प्रतिव्यक्ती तिकीट दर मोजावा लागला. बेळगावहून हैद्राबादला विमानसेवेव्यतिरिक्त इतर कोणतीही दळणवळणाची व्यवस्था नसल्याने 2 ते 3 हजार रुपये तिकीट आकारण्यात येत होते. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. खासगी ट्रॅव्हल्सचालकांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालणे गरजेचे आहे.
खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी तिकीट आकारणी
- प्रवास मार्ग नियमित तिकीट दर वाढीव तिकीट दर
- बेळगाव-मुंबई 1000 ते 1200 1700 ते 2200
- बेळगाव-पुणे 600 ते 1000 1200 ते 1700
- बेळगाव-हैद्राबाद 1200 ते 1800 2000 ते 3000
- बेळगाव-बेंगळूर 1000 ते 1200 1500 ते 2000
- बेळगाव-मंगळूर 700 ते 1000 1000 ते 1200









