जर्मनीत जॉब मार्केटमध्ये चकित करणारा ट्रेंड दिसून येत आहे. कंपन्या दीर्घकाळापासून आजारी असल्याचे निमित्त पुढे करत सुटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवत आहेत. याकरता खासगी हेरांकडून सेवा घेतली जात आहे. संबंधित कर्मचारी खरोखरच आवश्यक कारणासाठी सुटीवर होते का केवळ निमित्त देत होते हे कंपन्यांकडून जाणून घेतले जातेय. फ्रँकफर्टमधील लेंट्ज ग्रूप नाव असलेल्या एका खासगी डिटेक्टिव्ह एजेन्सीने यासंबंधी खुलासा केला आहे. आमची कंपनी दरवर्षी अशा 1200 प्रकरणांची चौकशी करते. हे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत दुप्पट असल्याचे डिटेक्टिव्ह एजेन्सीने सांगितले आहे.
आजारांच्या नावावर वाढत्या सुट्या
जर्मनीच्या स्टॅटिस्टिक्स एजेन्सी डेस्टेटिसच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये सरासरी प्रत्येक कर्मचाऱ्याने 11.1 दिवसांची आजारपणाची सुटी घेतली होती. 2023 मध्ये हे प्रमाण वाढून 15.1 दिवस झाले. 2023 मध्ये या सुट्यांमुळे देशाच्या जीडीपीत 0.8 टक्क्यांची घसरण झाली, यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागले.
जर्मनीतील कायदा ठरला कारण
जर्मनीतील कायद्यानुसार आजारी सुटीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना 6 आठवड्यांपर्यंत पूर्ण वेतन मिळते. यानंतर विमा कंपन्या त्यांचा खर्च उचलतात, परंतु ही व्यवस्था अनेक कंपन्यांसाठी वित्तीय भार ठरली आहे.
चौकशीतून चकित करणारे खुलासे
डिटेक्टिव्ह्जन स्वत:च्या चौकशीत अनेक चकित करणारे खुलासे केले आहेत. अनेक कर्मचारी आजाराच्या नावाखाली परिवाराच्या व्यवसायात मदत करत होते किंवा स्वत:च्या घराची दुरुस्ती करवित होते. एका प्रकरणात इटलीचा बस ड्रायव्हर ‘एंक्झाइटी’च्या निमित्ताने सुटीवर होता, परंतु या सुटीच्या काळात तो पबमध्ये स्टेज परफॉर्मन्स करत होता. परंतु इटलीच्या सर्वोच्च न्यायालयाने हा प्रकार त्याच्या आरोग्यासाठी चांगला ठरवत त्याला नोकरीवर परत घ्यायला लावले होते.
चीनमध्येही मोठी चर्चा
जर्मनीतील या घडामोडीमुळे चीनमध्येही चर्चा सुरू झाली आहे. चीनमध्ये आजारपणाच्या सुटीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा काही हिस्सा कापला जातो. जर्मनीत आजारपणाच्या सुटीवर परफॉर्मन्स बोनस अन् रिवॉर्ड्समध्ये कपात होत नसेल तर आमच्यासाठी हे एकप्रकारे स्वप्नवत असल्याचे एका चिनी युजरने म्हटले आहे. कंपन्यांनी डिटेक्टिव्ह्जवर पैसा खर्च करण्याऐवजी आजारांची वाढते कारण म्हणजे श्वसनसंबंधी समस्या, मानसिक आरोग्य आणि वर्कप्लेस स्ट्रेसवर लक्ष द्यावे असे तज्ञांचे सांगणे आहे.









