ग्रामीण भागातही गँगवॉरचे लोण : तरुणांचे पडताहेत मुडदे, बीट व्यवस्था लयाला, गुन्हेगारीचे मूळ शोधण्याची गरज
बेळगाव : पोलीस यंत्रणा कमकुवत किंवा निष्क्रिय बनली तर साहजिकच गुन्हेगारी कारवाया वाढीस लागतात. गुन्हेगारांच्या मनातील भीती नाहीशी होते. त्यामुळे ‘आमचे कोण काय करून घेणार आहे’ या थाटात गुन्हेगार वावरू लागतात. गँगवारसारखी परिस्थिती निर्माण होते. एकमेकांचे मुडदे पाडण्यात मागेपुढे पाहिले जात नाही. सध्या बेळगाव पूर्वभागात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एका मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात खुनांची मालिकाच सुरू आहे. मारिहाळ येथील महांतेश रुद्राप्पा करलिंगण्णावर (वय 24) या तरुणाचा गावातील सरकारी शाळेच्या आवारात गुरुवार दि. 18 मे रोजी रात्री तलवारीने वार करून खून करण्यात आला. खुनानंतर चोवीस तासात स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरारी आहेत. तरुणाच्या या खुनाने परिसरातील अनेक समस्या, गुन्हेगारी, पोलीस अधिकाऱ्यांची निष्क्रियता, कमकुवत बनत चाललेली बीट व्यवस्था आदींवर प्रकाश टाकला आहे. मारिहाळ, सुळेभावी, मुतगा, मुचंडी परिसरात गेल्या एक-दोन वर्षातील खुनांची मालिका लक्षात घेता पोलिसांना या परिसरातील गुन्हेगारीचे मूळ शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक खुनामागचे कारण वेगळे असते. काही प्रकरणात गुन्हेगारांना अटक झाली आहे तर काही प्रकरणांचा अद्याप छडा लागलेला नाही. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली खुनांची मालिका लक्षात घेता या परिसरात बोकाळलेली खासगी सावकारी अनेक खुनांमागील प्रमुख कारण आहे. अडीअडचणीला लोक खासगी सावकारांकडे धाव घेतात. कर्जाची उचल करतात. वेळेत त्याची परतफेड केली नाही किंवा किमान व्याज तरी भरले नाही तर खासगी सावकार आणि वसुलीसाठी त्यांनी पाळलेल्या गुंडांची दादागिरी सुरू होते. या दादागिरीतूनच वादावादी होते. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यानंतर एखाद्याचा मुडदा पाडला जातो.
सबबीट व्यवस्था कोलमडली
प्रत्येक गावातील, गल्लीबोळातील घडामोडींची पोलिसांना माहिती मिळावी यासाठी सबबीट व्यवस्था जारी करण्यात आली. सध्या संपूर्ण कर्नाटकात ही व्यवस्था अस्तित्वात आहे. सबबीटची सुरुवात बेळगाव जिल्ह्यातूनच झाली आहे. मात्र, बेळगावातच ही व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येते. गावागावात खासगी सावकारीतून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडू लागल्या आहेत. तरीही पोलीस अधिकाऱ्यांचे अशा घटनांकडे दुर्लक्षच होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्येही गँगवॉरसाठी चढाओढ सुरू झाली आहे. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अशा चढाओढीतून अनेक खून झाले आहेत. बेळगावकर दसरोत्सवाच्या आनंदात होते. त्यावेळी 6 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री सुळेभावी येथे रणधीर ऊर्फ महेश मुरारी (वय 26), प्रकाश हुंकरी-पाटील (वय 24) या दोन तरुणांचा भीषण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांची धरपकड केली. त्याआधी 31 मार्च 2022 रोजी करडीगुद्दीजवळ मुदकाप्पा अंगडी (वय 25) रा. सुनकुप्पी या तरुणाचा गँगवॉरमध्ये खून झाला. या प्रकरणाचाही छडा लागला. आरोपींची धरपकड झाली. एखाद्या खुनानंतर कोणती खबरदारी घ्यायची? गुन्हेगारी कारवायात गुंतलेल्या तरुणाईवर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कोणती कारवाई करायची? याचा विचारही झाला नाही. बेळगावात अनेक प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. एखाद्या घटनेनंतर गुन्हेगार व गुन्हेगारी कारवायांविरुद्ध मोहीम राबविण्याची प्रथा होती. ही प्रथा तर मोडीत निघाली आहे. त्यामुळेच गुन्हेगारांचे फावले आहे. निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे आमचे कोण वाकडे करणार आहे? असा मी पणा फोफावला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी निष्क्रिय यंत्रणेला चालना देऊन गुन्हेगारी कारवायांविरुद्ध खास करून अनेक तरुणांच्या खुनाला कारणीभूत ठरत असलेल्या खासगी सावकारीविरुद्ध मोहीम राबविण्याची गरज आहे. सध्या कार्यरत अधिकारी मटका, जुगारी अ•sचालक व खासगी सावकारांचे मिंधे बनून आहेत. खऱ्या गुन्हेगारांना मोकाट सोडून निष्पापांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलीस दलावर जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
निष्क्रिय पोलीस यंत्रणेला जाग आणण्याची गरज
मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत. 26 नोव्हेंबर 2020 रोजी कबलापूरजवळ निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31) मूळचे राहणार उदगीर, जि. लातूर, महाराष्ट्र, सध्या राहणार महांतेशनगर या युवकाचा खून झाला होता. अडीच वर्षे उलटली तरी निशिकांतचा खून कोणी व कशासाठी केला? याचा तपास करण्यात मारिहाळ पोलिसांना यश आले नाही. तपास तर दूर उलट प्रकरणच गुंडाळण्याच्या तयारीत यंत्रणा आहे. 5 जुलै 2022 रोजी मुतगा येथील शशिकांत अष्टेकर यांच्या विहिरीत सुमारे 25 ते 35 वर्षीय अनोळखी युवकाचा शिरविरहित मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कोणाचा? याचा शोध घेणेच अद्याप शक्य झाले नाही. अनेकांचे हकनाक बळी पडले आहेत. यापुढे अशा घटना टाळायच्या असतील तर निष्क्रिय पोलीस यंत्रणेला जाग आणण्याची गरज आहे.









