उच्च न्यायालयाची टिप्पणी : केवळ भरती करून घेण्याशी अर्थ
वृत्तसंस्था/ प्रयागराज
खासगी रुग्णालये रुग्णांना एटीएमप्रमाणे वापरत असल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केली आहे. एका प्रकरणात डॉक्टरच्या विरोधात नोंद गुन्हा हटविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. डॉ. अशोक कुमार यांनी एका गरोदर महिलेला शस्त्रक्रियेसाठी अॅडमिट करून घेतले होते, प्रत्यक्षात त्यांच्याकडे अॅनेस्थिटिस्ट नव्हता, तो खूप उशिरा पोहोचला आणि तोपर्यंत गर्भात वाढणाऱ्या भ्रूणाचा मृत्यू झाला होता.
रुग्णालय प्रथम रुग्णांना भरती करून घेतात आणि मग संबंधित डॉक्टराला बोलाविले जाते, हा प्रकार आता सर्वत्र होताना दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. खासगी रुग्णालये स्वत:कडे संबंधित आजारासाठी तज्ञ डॉक्टर नसला तरीही रुग्णांना अॅडमिट करून घेत आहेत. रुग्णांना भरती केल्यावरच डॉक्टरला कॉल केला जातो. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांचा वापर एटीएमप्रमाणे केला जात असल्याची धारणा तयार झाली आहे. तर पूर्ण गांभीर्याने काम करणाऱ्या वैद्यकीय प्रोफेशनल्सना संरक्षण मिळायला हवे असे न्यायालयाने म्हटले आहे.
पुरेशा सुविधांशिवाय रुग्णालय सुरू करणाऱ्या लोकांना कारवाई आवश्यक आहे. अशाप्रकारचे लोक केवळ रुग्णांकडून मनमानीपणे पैसे कमाविण्यासाठी रुग्णालय सुरू करत असतात असे न्यायालयाने नमूद केले आहे. तर सुनावणीदरम्यान न्यायालयाने महिलेचे कुटुंबीय शस्त्रक्रियेसाठी तयारच नव्हते हा डॉक्टरचा युक्तिवाद फेटाळला आहे. हे प्रकरण पूर्णपणे निष्काळजीपणा आणि अवैध कमाईचे आहे. डॉक्टरने महिलेला अॅडमिट करून घेतले, परिवाराकडून शस्त्रक्रियेची मंजुरी मिळाली तरीही डॉक्टर ती टाळत राहिला, कारण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक डॉक्टरच उपलब्ध नव्हता असे न्यायालयाने म्हटले आहे.









